esakal | Gujarat Municipal Election result : भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल गुजरातच्या जनतेचे आभार - मोदी

बोलून बातमी शोधा

gujrat panchayat election

गुजरातच्या नागरपालिका, जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत.

Gujarat Municipal Election result : भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल गुजरातच्या जनतेचे आभार - मोदी
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

गुजरातच्या नागरपालिका, जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. ८१ नगरपालिका, ३१ जिल्हा पंचायती आणि २३१ तालुका पंचायतींसाठी रविवारी सरसरी ६० टक्क्यांहून अधिक मतदान झालं होतं. यांपैकी नगरपालिकांसाठी ५८.८२, जिल्हा पंचायतींसाठी ६५.८० तर तालुका पंचायतींसाठी ६६.६० टक्के मतदान झालं होतं. एकूण ८,२३५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे ८,१६१, काँग्रेसचे ७,७७८ तर आम आदमी पार्टीचे २,०९० उमेदवार रिंगणात होते. 

Updates :

- गुजरात भाजपासोबत असल्याचे निकालांवरुन स्पष्ट

निकालावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "गुजरातमध्ये झालेल्या नगरपालिका, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांचे निकालाने स्पष्टपणे संदेश दिला की, भाजपच्या विकास आणि सुशासनाच्या कामगिरीवर गुजरातच्या जनतेने आमची साथ दिली. या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मी गुजरातसमोर आपली मान झुकवतो."
  
- निवडणुकीचे निकाल विकास आणि विश्वासाचे प्रतिक - नड्डा


या निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जनतेचे आभार मानले आहेत. भाजपावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल गुजरातच्या जनतेला धन्यवाद देतो. हे स्थानिक पंचायत निवडणुकांचे निकाल विकास आणि विश्वासाचे प्रतिक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

- गीर सोमनाथ येथे एका मतानं भाजपचा विजय

गीर सोमनाथ येथील सुत्रापाडा तालुका पंचायतमध्ये भाजप उमेदवाराला एका मताने विजय मिळाला आहे. तर अमरेलीच्या धारीमध्ये भाडेलच्या जागेवर आपच्या उमेदवाराला दोन मतांनी विजय मिळाला.  

- देशात फूटीचं राजकारण चालणार नाही - संबित पात्रा

निकालांवर भाष्य करताना भाजपा नेते संबित पात्रा म्हणाले, "गुजरातमध्ये आज ज्या प्रकारे स्थानिक निवडणुकांचे निकाल येत आहेत. यावरुन सिद्ध होतंय की देशात फूटीचं नव्हे तर केवळ विकासाचं राजकारण चालणार आहे." 

- काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी

दुपारी एक वाजेपर्यंत आलेल्या निकालांनुसार भाजप मोठ्या आघाडीच्या दिशेने जात असल्याचे चित्र होते. तर काँग्रेसची कामगिरी अत्यंत वाईट झाली आहे.

- 'आप'चा आत्तापर्यंत ४६ जागांवर मिळालं यश

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आपने नगरपालिका, जिल्हा पंचायत आणि तालुका निवडणुकीतही चांगली कामगिरी केली आहे. दुपारपर्यंत आपने ४६ जागांवर विजय मिळवला होता.

- शहरांनंतर आता ग्रामीण भागातही भाजपला फटका
गुजरातच्या शहरांमधील निवडणुकांनंतर आता काँग्रेसला गावांमधूनही मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. साबरकाठा येथे काँग्रेस आमदार अश्विन कोटवाल यांचा मुलगा यश कोटवाल तालुका पंचायत निवडणूकीत हार पत्करावी लागली आहे. राज्यातील ३१ जिल्हा पंचायतींमध्ये भाजपा २० जागांवर पुढे आहे. 

- सर्वच ठिकाणी भाजपा आघाडीवर

२३१ तालुका पंचायतींमध्ये भाजपा ७३ जागांवर, काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे. तर ३१ जिल्हा पंचायतींमध्ये भाजपा २८ जागांवर आघाडीवर आहे. तर ८१ नगरपालिकांमध्ये भाजपा ६० जागांवर, काँग्रेस ६ जागांवर तर इतर एका जागेवर आघाडीवर आहे.