'केम छो ट्रम्प'! ट्रम्प यांच्या स्वागतासाठी गुजरात सज्ज

पीटीआय
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

गुजरातेत ‘केम छो ट्रम्प’
गुजरातमधील कार्यक्रमाचे स्वरूपही हाऊडी ट्रम्प असेच राहील. गुजरातीमध्ये त्याला ‘केम छो ट्रम्प’ असे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती एका स्थानिकाने दिली. मोटेरा स्टेडियममध्ये एक लाख दहा हजारांपेक्षाही अधिक लोक मावू शकतात. हे स्टेडियम ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथील स्टेडियमपेक्षाही मोठे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अहमदाबाद महापालिकेने ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आतापासूनच तयारी चालविली असून, अधिकाऱ्यांना त्यांची कामे नेमून देण्यात आली आहे.

अहमदाबाद - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतामध्ये ‘न भूतो...’ असे स्वागत करण्याचे नियोजन सरकारने आखले आहे. सरकारच्या नियोजनानुसार ट्रम्प हे अहमदाबादेतील रोड शोमध्येही सहभागी होणार असून, ते साबरमती आश्रमालाही भेट देतील. येथेच त्यांच्या हस्ते नव्या क्रिकेट स्टेडियमचे देखील उद्‍घाटन होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रम्प यांचे २४ रोजी भारतात आगमन होईल, त्यानंतर ते थेट मोदींचे होम पीच असलेल्या गुजरातला भेट देतील. अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रम अशा दहा किलोमीटरच्या रोड शोचे यासाठी खास आयोजन करण्यात आले आहे. साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर ते मोटेरा परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे उद्‍घाटन करतील, येथेच ते उपस्थितांना मार्गदर्शनही करतील, या कार्यक्रमाला जवळपास एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी अमेरिकेत झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या धर्तीवरच या कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद ! आणि, त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे (संदर्भ : इंडियन एक्स्प्रेस) “केम छो मिस्टर प्रेसिडेंट?”.. “केम छो?”.. “केम छो” का?
-अमेय खोपकर, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपटसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat ready for Trumps welcome