Video : गुजरात दंगलीमधील ‘तो’ भेदरलेला चेहरा, आज करतोय टेलर काम

Video : गुजरात दंगलीमधील ‘तो’ भेदरलेला चेहरा, आज करतोय टेलर काम

अहमदाबाद : गुजरात दंगलीमध्ये केवळ गुजरातच नव्हे तर, संपूर्ण भारत होरपळला. दंगल होऊन अनेक वर्षे लोटली, गुजरात शांत झाला. पण, तरीही आज गुजरातमध्ये या दंगलीच्या खुणा आढळतात. त्या काळात घडलेल्या घटनांबद्दल अनेकांना दुःख वाटते. ही परिस्थिती आम्ही थेट गुजरातमध्ये जाऊन अनुभवलीय.

‘कसा तरी जीव वाचला’
अहमदाबादमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीत कुतूबुद्दीन अन्सारीचा चेहरा जगाने पाहिला. त्यांच्या डोळ्यातले अश्रू, चेहऱ्यावरील भीतीने देशाला सुन्न करून टाकले होते. हेच कुतुबुद्दीन आता अहमदाबादमध्ये सामान्य आणि शांततेत जीवन जगत आहेत. टेलरिंगचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करीत आहे. त्यांना भेटण्याचा योग आला, तो येथील सामाजिक कार्यकर्ते कलीम सिद्दीकी यांच्या माध्यमातून. ते बिरजूनगर भागातील सोने की चाल भागात कुटुंबासमवेत राहतात. त्या दंगलीवेळी घडलेले प्रसंग आणि 'त्या' फोटोची जन्मकथाही त्यांनी सांगितली. अन्सारी म्हणाले, 'फेब्रुवारी 2002 मध्ये दंगल झाली. त्यावेळी नरोडा राष्ट्रीय महामार्गालगत रहिमतनगर भागात ते राहात होते. हल्ल्यांमुळे या भागातील अनेक कुटुंब मदत छावण्यांमध्ये आश्रयाला गेले होते. पण, कुतुबुद्दीन हे त्यांच्या घरात जीव वाचविण्यासाठी लपून होते. हल्लेखोर पुन्हा त्या परिसरात आले. घरांमध्ये कुणीच नाही असे समजून ते पुढे गेले.'

अन्सारी म्हणाले, 'शीघ्र कृती दलाच्या काही गाड्या पत्रकारांना घेऊन या परिसरात आल्या होत्या. त्यावेळी जिवाच्या आकांताने त्यांना आरोळी देत मी पुढे गेलो. आमचा जीव वाचवा, अशी हात जोडून विनवणी करीत होतो. त्याचवेळी पोलिसांच्या गाडीत असलेल्या पत्रकारांनी माझी छायाचित्रे टिपली. त्यातील एक छायाचित्र जगभर गेले. नंतर अनेक पत्रकारांनी माझा शोध घेतला आणि मी जिवंत असल्याच्या बातम्या झाल्या, अशा माहिती अन्सारी यांनी सकाळशी बोलताना दिली.  

‘अशोक आणि मी चांगले मित्र’
अन्सारी म्हणाले, ‘माझ्या फोटोचे अनेक अन्वयार्थ लावण्यात आले. आता सर्वसाधारणपणे सुखी आयुष्य जगतो आहे. कुणाबद्दल राग नाही, द्वेष नाही. माझ्यासारखीच अशोक परमारचा फोटोही चर्चेत आला. त्याची ओळख कट्टर हिंदुत्ववादी बनली होती. आता आम्ही दोघे मित्र आहोत. कालच त्याच्या फुटवेअर दुकानाचे उद्घाटन झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com