Article 370 : काश्मीर खोऱ्यात दहशतवादी अद्यापही सक्रिय

वृत्तसंस्था
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

काश्‍मीरमध्ये शांतता आहे आणि जनजीवन सामान्य असून, त्यांचे (पाकिस्तान) कटकारस्थान कधीही यशस्वी होणार नाही, असाही इशारा डोवाल यांनी दिला.

नवी दिल्ली : काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले.

काश्‍मीरमध्ये शांतता आहे आणि जनजीवन सामान्य असून, त्यांचे (पाकिस्तान) कटकारस्थान कधीही यशस्वी होणार नाही, असाही इशारा डोवाल यांनी दिला. मात्र, काश्‍मीरमध्ये दहशतवादी सक्रिय असल्याचे अजित डोवाल यांनी सांगतानाच केंद्र सरकार आणि सुरक्षा दल हे प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले. काश्‍मीरमधील कलम 370 काढून घेण्याच्या निर्णयास महिना पूर्ण झाला. या पार्श्‍वभूमीवर डोवाल यांनी निवडक पत्रकारांना काश्‍मीरमधील सद्यःस्थितीची माहिती दिली.

काहीजण स्वार्थी भावनेतून निर्णयाचा विरोध करीत आहेत. जवानांकडून नागरिकांना सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या आरोपाचा डोवाल यांनी इन्कार केला. भारतीय जवान दहशतवाद्यांच्या मुकाबल्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. स्थानिक पोलिस आणि निमलष्करी दल हे काश्‍मीरची सुरक्षाव्यवस्था सांभाळत आहेत. त्यामुळे लष्कराकडून त्रास देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे डोवाल म्हणाले. 

जम्मू-काश्‍मीरमधील स्थिती सामान्य असून, सध्या राज्यातील 199 पैकी 10 पोलिस ठाण्यांतर्गत निर्बंध आहेत. ती दहा ठाणी वगळता कोठेही निर्बंध नाहीत. शंभर टक्के लॅंडलाइन फोन काम करीत आहेत. 
- अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; चिमुरडीसह चौघे जखमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrorists still active in Kashmir Valley says NSA Ajit Doval