Gujrat: मुस्लिम तरुण गरबा कार्यक्रमात शिरले म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujrat: मुस्लिम तरुण गरबा कार्यक्रमात शिरले म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

Gujrat: मुस्लिम तरुण गरबा कार्यक्रमात शिरले म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

दांडिया कार्यक्रमात आधार कार्ड बघून प्रवेश द्या अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली होती. याचदरम्यान सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुणांना काही लोक मारहाण करत आहेत. या व्हिडीओमध्ये ज्या व्यक्तींना मारहाण केली जात आहे, ते दोघे मुस्लिम तरुण असल्याचं बोललं जात आहे. सदर घटना अहमदाबादमधील गरबा कार्यक्रमातील असल्याची माहिती समोर येत आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या मुस्लिम तरुणांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

वाईट उद्देशाने हे मुस्लिम तरुण गरबा कार्यक्रमात शिरल्याचा दावा यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या व्यक्तींना पकडल्यानंतर त्यांना चोप दिला आहे. त्यानंतर या मुस्लिम तरुणांचे कपडेही फाडण्यात आले. त्यांना उघडं करुन कार्यकर्ते त्यांना मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. घाबरलेल्या तरुणांनी कार्यकर्त्यांच्या तावडीतून कसाबसा पळ काढला.

न्यूज 24 ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दोघे मुस्लिम तरुण गरबा कार्यक्रमात आले असल्याची माहिती मिळाल्याने कार्यकर्ते गरबा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी मुस्लिम तरुणांना जाब विचारण्यास सुरुवात केली. तरुणांकडे काही ठोस उत्तर न आल्यामुळे अखेर संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ अहमदाबादच्या एसपी रिंग रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या गरबा उत्सवातील असल्याचं सांगितलं जातं आहे. अद्याप या घटनेबाबत कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. चौकशीत कुणी दोषी आढळलं, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :Gujaratmuslim