Viral : गुजरातमध्ये पूल कोसळला अन् PM मोदींचं बंगालमधील 'ते' भाषण झालं Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra MOdi

Viral : गुजरातमध्ये पूल कोसळला अन् PM मोदींचं बंगालमधील 'ते' भाषण झालं Viral

मोरबी : गुजरात राज्यातील मोरबी येथील मच्छू नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत जवळपास १३२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. एकीकडे त्यांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०१६ मधील एका भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(PM Narendra Modi Viral Speech)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ २०१६ मधील असल्याचं समोर आलं आहे. २०१६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी भाषण करत असताना त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. हा व्हिडिओ सध्या समोर आला असून ते त्यावेळी बंगालमध्ये तुटलेल्या पुलाचा संदर्भ देत आहेत.

हेही वाचा: Gujrat Bridge Collapse: फक्त सर्वसामान्यच नाही तर भाजप खासदाराचे 12 कुटुंबीय मृत्यूमुखी

काय म्हणाले मोदी?

"हा पूल निवडणुकीच्या दरम्यान पडला कारण लोकांना समजलं पाहिजे की, यांनी कसं सरकार चालवलंय, त्यामुळे देवाने लोकांना संदेश दिलाय की आज हा पूल तुटला, उद्या या बंगालचे असेच तुकडे केले जातील... हे सांगण्यासाठी देवाने हा संदेश पाठवला आहे" असं मोदी त्यावेळी बोलताना म्हणाले होते.

काय आहे घटना?

कोलकत्तामध्ये गणेश टॉकीज परिसरातील बाराबाझार येथील पूल कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५० हून अधिक जखमी झाले होते. तर या दुर्घटनेचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटले होते. भाजपने या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधण्यासाठी या दुर्घटनेचा वापर केला होता.

का होत आहे हा व्हिडिओ व्हायरल?

२०१६ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बोलण्यासाठी मोदींनी पूल तुटल्याचा संदर्भ दिला होता. तर आता येत्या वर्षात गुजरातच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. "निवडणुकांच्या तोंडावर यांनी सरकारं कसं चालवंल ते लोकांना कळावं यासाठी हा पूल पडला" असं मोदींनी वक्तव्य केलं होतं तर आता मोदींचं हेच वाक्य भाजपची सत्ता असलेल्या गुजरात राज्याशी कनेक्च केलं जात आहे.

काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी आपल्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. "पूल पडल्यावर काँग्रेसचा कोणताच नेता असं बोलणार नाही पण मोदी त्यावेळी कसं बोलले होते पाहा" असं म्हणत राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.