नामांतराचं वारं लागलं फळाला! भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी 'ड्रॅगन फ्रूट'च केलं बारसं

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 20 January 2021

भाजपची सत्ता असलेल्या राज्यामध्ये एका फळाचे नाव बदलण्यात आलं आहे. 

गांधीनगर- देशात शहरांची नावं बदलण्याची मोहिम जोरदार सुरु आहे. सध्या महाराष्ट्रात औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने याआधीच अनेक शहराची नावं बदलली आहेत. त्यातच आता भाजपची सत्ता असलेल्या राज्यामध्ये एका फळाचे नाव बदलण्यात आलं आहे. 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूट म्हणून प्रसिद्ध असलेल्या फळाचं नामकरण केलं आहे. त्यांनी ड्रॅगन फ्रूटचं नाव कमलम (कमळ) असं ठेवलं आहे. कमलम हा एक संस्कृत शब्द आहे. विजय रुपाणी यांनी थेट एका फळाचं बारसं करुन टाकलं आहे. त्यामुळे आता गुजरातमध्ये ड्रॅगन फ्रूटला कमलम म्हणून ओळखलं जाणार आहे. 

'भाईजानचा 'राधे' होणार ईदला प्रदर्शित; 250 कोटींची ऑफर नाकारली...

फळाला ड्रॅगन म्हणणं योग्य नाही. ड्रॅगन फ्रूट हे फळ कमळासारखं दिसतं. त्यामुळे या फळाचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. फळाला संस्कृत शब्दानुसार कमलम असं नाव देण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले आहेत. गुजरातमधील कच्छ आणि नवसारी भागात ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते. याठिकाणी चिनी ड्रॅगन फ्रूटचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. फळाचं नाव ड्रॅगन असणं चांगलं वाटत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नाव बदललं आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटला गुजरातमध्ये नवं नाव मिळालं आहे. 

स्वत: संकटात असूनही भारताने निभावला शेजार धर्म; 6 देशांना पाठवतोय कोरोना लस

गुजरातच्या वन विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्यासाठी याचिका दाखल केली होती. ड्रॅगन फ्रूट हे फळ कमळासारखं दिसते आणि शेतकरीही या फळाला कमळ फळ म्हणून ओळखत आहेत. त्यामुळे या फळाचे पारंपरिक नाव बदलून कमळम करण्यात यावी अशी मागणी गुजरातच्या वन विभागाने केली होती. त्यानंतर राज्य सरकारने फळाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. 

ड्रॅगन फ्रूटला आता कमळ म्हणून ओळखलं जाणार असलं तरी लाल आणि गुलाबी रंगाच्या या फळाचं नवं नामकरण गुजरात पुरतंच मर्यादित राहणार आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या प्रदेश मुख्यालय असलेल्या कार्यालयाचं नावही कमलमच आहे. दरम्यान, विजय रुपाणी यांच्या नव्या निर्णयामुळे चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gujrat cm vijay rupani rename dragon fruit as kamalam