गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे गुरुवारी निधन झालं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं.

गांधीनगर - गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे गुरुवारी निधन झालं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. 92 वर्षीय केशुभाई यांनी 6 वर्षांपूर्वी 2014 मध्ये राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. 

केशुभाई पटेल यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. उपचारानंतर ते कोरोनामधून ठणठणीत बरेही झाले होते. केशुभाई यांच्या निधनानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शोक व्यक्त केला आहे. 

केशुभाई पटेल यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांची तब्येत सातत्याने खालावत चालली होती. गुरुवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. मात्र त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. 

हे वाचा - PM मोदी म्हणाले, कोरोनाविरोधातील लढा प्रभावी; प्रत्येकापर्यंत लस पोहोचवणार

केशुभाई यांनी दोनवेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. 1995 आणि 1998 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र 2001 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. 

गुजरातमधील भारतीय जनता पक्षातील दिग्गज नेत्यांपैकी केशुभाई एक होते. जनसंघापासून त्यांनी पक्षासाठी काम केलं होतं. गुजरातमध्ये भाजपचा पहिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gujrat former cm keshubhai patel passes away