PM मोदी म्हणाले, कोरोनाविरोधातील लढा प्रभावी; प्रत्येकापर्यंत लस पोहोचवणार

modi pm
modi pm

कोरोनाविरोधात दिलेल्या लढ्याबाबतचे आकलन, यातून आपण काय शिकलो, अर्थव्यवस्थेवरील परिणाम सावरण्यासाठी केलेले प्रयत्न अशा अनेक विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकॉनॉमिक टाइम्सला मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्यांनी या साऱ्या प्रश्नांचा उहापोह केला आहे. गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाविरोधात सुरु असलेल्या लढ्याचे आकलन आणि पुढची दिशा त्यांनी स्पष्ट केली आहे. लसनिर्मिती आणि लशीकरणाची प्रक्रीया याबाबतही त्यांनी मते मांडली आहेत. इतकंच नव्हे तर या दरम्यानच संसदेत पारित झालेल्या कृषी आणि कामगार विषयक कायद्यांबाबतही त्यांनी संवाद साधला आहे.

कोरोनाविरोधात आपली लढाई प्रभावी
कोरोना व्हायरसविरोधात लढाईला आता सात महिने  पूर्ण झाले आहेत. आपण कशापद्धतीने लढलो आहोत, याबाबत आपले आकलन काय आहे? या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा व्हायरस आपल्या सगळ्यांसाठीच नवीन होता. त्यामुळे या अनोळखी व्हायरसविरोधात लढताना आपली त्याबाबतची प्रतिक्रीयादेखील विकसित होत जाते. मी काही हेल्थ एक्सपर्ट नाहीये पण माझे आकलन आकड्यांवर अवलंबून आहे. आपण या  लढाईत किती लोकांना वाचवू शकलो यावर आपल्या लढाईचे यश अवलंबून आहे, असं मला वाटतं. 

कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबतच्या अवस्थेबाबत आपले आकलन मांडताना मोदी म्हणाले की, विषाणू पसरण्याच्या सुरवातीच्या काळातच आपण केलेल्या कृतीशील उपाययोजनांमुळे या महामारीत आपण चांगल्या पद्धतीने मदत झाली आहे. आपल्या इतक्या विस्तृत देशाकडे पाहता एखाद्याच्या मृत्यू दुखद असला तरीही आपल्या देशातील कोरोनाचा मृत्यू दर हा सर्वांत कमी मृत्यूदरांपैकी एक आहे. 
तसेच ते म्हणाले की, आपल्या देशातील ऍक्टीव्ह केसेस लक्षणीयरित्या घटत असून रिकव्हरी रेट देखील वाढत आहे. एकीकडे सप्टेंबर महिन्यात 97,894 केसेस दररोज सापडत असताना आता भारतात फक्त 50 हजारच्या आसपासच केसेस सापडत आहेत. संपूर्ण भारत एकत्र येऊन लढल्यामुळेच हे शक्य झाले आहे. 

आकडे घटताहेत मात्र सजग राहू
अलिकडील आकडे पाहिले तर लक्षात येतं की ऍक्टीव्ह रुग्ण आणि मृत्यूदर यांचा आलेख आता घसरताना दिसतोय, ही आशादायक बाब आहे. आतापर्यंत सरकारकडे उपलब्ध माहितीच्या आधारे बोलताना ते म्हणाले, की हा नवा व्हायरस आहे. ज्या देशांनी सुरवातीला परिस्थितीवर ताबा मिळवण्यात यश मिळवलं त्या देशांत आता पुन्हा उद्रेक दिसून येतोय. भारताचा भौगोलिक विस्तार, लोकसंख्येची घनता, सार्वजनिक संपर्क या सगळ्या गोष्टींचा विचार करता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याचे परिणाम हे अगदी वेगवेगळे आहेत. काही भागात अत्यंत कमी केसेस आहेत तर काही ठिकाणी खूपच जास्त. 700 हून अधिक जिल्हे असणाऱ्या देशांत कोरोनाचा परिणाम हा फक्त काही राज्यातील मोजक्याच जिल्ह्यात दिसून आला आहे. देशांतील केसेस कमी होतायत ही आनंदाची बाब जरुर असली तरी ती साजरी करण्यासारखी नाहीये. आपण या काळात आपण निश्चय, आपली यंत्रणा या बाबी अधिक मजबूत कशा होतील हे पाहिलं पाहिजे.

सुधारित कृषी व कामगार कायद्यांचा फायदा
नवे कृषी कायदे आणि कामगार कायद्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना मोदी म्हणाले की, भारतीय कृषी क्षेत्रात ज्याची उणीव भासली आहे ती गोष्ट म्हणजे आपल्या शेतकर्‍यांच्या रक्ताची आणि परिश्रमांची परतफेड. कृषी क्षेत्रात केलेल्या या नव्या सुधारणांनी आपल्या शेतकर्‍यांच्या नफ्यात लक्षणीय वाढ होईल, अशी मला खात्री आहे. कामगार कायद्यांतील सुधारणेबाबत ते म्हणाले की, या सुधारणांमुळे कामगारांना वेळेवर  पगार मिळेल आणि कामगारांच्या व्यावसायिक सुरक्षेला प्राधान्य मिळेल, जेणेकरून काम करण्यासाठी चांगल्या वातावरणाला हातभार लागेल.

लस आल्यानंतर तीच्या वितरणाची तयारी सरकार कशापद्धतीने करत आहे, या लशीकरणाच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्हाला आत्मविश्वास आहे की, एकदा का आपल्याला लस प्राप्त झाली की आपण देशांतील प्रत्येक नागरिकापर्यंत लवकरात लवकर पोहचू शकू. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेबाबत मोदी म्हणाले की, आत्मनिर्भर भारत ही संकल्पना केवळ कुणाशी तरी स्पर्धा करण्यासाठी नाहीये तर स्वकर्तृत्वाबद्दल आहे. कुणावर तरी वर्चस्व गाजवण्यासाठी नाही तर विश्वासार्हतेबद्दल आहे. एक स्वावलंबी भारत हा जगासाठी अधिक विश्वासार्ह मित्र ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com