
VIDEO : ''माझ्या वडिलांची समस्या...'', मुलगी रडायला लागताच PM मोदी भावूक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गुरुवारी गुजरातमधील सरकारी योजनाच्या लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी वातावरण अचानकच भावूक झाले होते. एका मुलीने चर्चेदरम्यान आपल्या वडिलांची परिस्थिती सांगितली. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले. त्यानंतर स्वतः पंतप्रधान मोदी देखील भावूक झालेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
हेही वाचा: 'ग्लोबल कोविड समिट'मध्ये PM मोदी होणार सहभागी; बायडन यांचं निमंत्रण
एका अयुब पटेल नावाच्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांच्या आजाराबद्दल पंतप्रधान मोदींना सांगितले. माझ्या डोळ्यांची दृष्टी खूपच कमी झाली आहे. मला ग्लुकोमा झाला आहे. आता हा आजार कमी होण्याची शक्यता नाही, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं ती व्यक्ती पंतप्रधानांना सांगतेय. या घटनेचा व्हिडिओ एएनआयने ट्विट केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी त्या व्यक्तीला विचारतात, मुलींना शिक्षण देता काय? त्यावर ती व्यक्ती म्हणतेय, होय मुली शिकतात आणि त्यांना सरकारी स्कॉलरशीप देखील मिळतेय. तुमच्या मुलींचं स्वप्न काय आहे? असं पंतप्रधानांनी विचारल्यानंतर ते सांगतात, की माझ्या मोठ्या मुलीला डॉक्टर बनायचं आहे. आताच निकाल आला आहे. त्यावर पंतप्रधान म्हणतात, की तुमची मुलगी इथं उपस्थित आहे का? असेल तर तिला बोलायला सांगा.
मुलगी पंतप्रधान मोदींसोबत बोलताना तिला तिचं नाव विचारतात. त्यानंतर मुलगी आलिया पटेल, असं तिचं नाव सांगतेय. त्यानंतर पंतप्रधान विचारतात की, तुझ्या मनात डॉक्टर बनण्याचा विचार का आला? माझ्या वडिलांची डोळ्यांची समस्या पाहून हा विचार आला, असं म्हणताच मुलगी रडायला लागली. त्यानंतर ती भावूक झाली असून बोलू शकणार नाही, असं तिचे वडील अयुब पंतप्रधान मोदींना सांगतात. त्यानंतर पंतप्रधान मोदी देखील भावूक झालेले पाहायला मिळाले. ते काही वेळासाठी स्तब्ध झाले. त्यानंतर काही वेळातच उपस्थितांनी त्या मुलीवर टाळ्यांचा वर्षाव केला.
वडिलांबाबत तुला जी आत्मीयता वाटते तीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे, असा सल्ला मोदींनी त्या मुलीला दिला. तसेच सर्वांनी कोरोनाची लस घेतली की नाही? याबाबत विचारपूस केली. तसेच ईद कशाप्रकारे साजरी केली? असंही मोदींनी विचारलं. मुलींना नवे कपडे आणि पैसे देऊन ईद साजरी केल्याचं अयुब पटेल यांनी मोदींना सांगितलं.
Web Title: Gujrat Girl Shared Father Problems Pm Modi Gets Emotional
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..