Positive story: तुरुंगात शिक्षा भोगताना केला विश्वविक्रम; 8 वर्षात 31 पदव्या आणि सरकारी नोकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 15 November 2020

गुजरात राज्यामध्ये एक अत्यंत दुर्मिळ उदाहरण पाहायला मिळालं आहे.

अहमदाबाद- शिकण्याची इच्छा असल्यास माणूस कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घेऊ शकतो. अगदी उतारवयातही आपले शिक्षण पूर्ण करुन पदवी घेतल्याची आपल्याला अनेक उदाहरणे सापडतील. पण, गुजरात राज्यामध्ये एक अत्यंत दुर्मिळ उदाहरण पाहायला मिळालं आहे. तुरुंगातील एका कैद्याने आपल्या 10 वर्षाच्या शिक्षेच्या कालावधीत दोन चार नव्हे तर तब्बल 31 पदव्या मिळवल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने तुरुंगातून बाहेर पडताच सरकारी नोकरीही मिळवली आहे. 

गुजरातमधील भावनगर येथील भानूभाई पटेल यांनी हे अशक्य वाटणारे काम करुन दाखवलं आहे. भानूभाई हे 59 वर्षांचे आहेत. त्यांनी अहमदाबादमधील बीजे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळवली. त्यानंतर 1992 मध्ये ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. यावेळी त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली. त्यांचा एक मित्र विद्यार्थी व्हिजावर काम करुन पैसे त्यांच्या खात्यावर टाकायचा. यामुळे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या उल्लंघनाप्रकरणी भानूभाईंना अटक करण्यात आली. त्यांना वयाच्या 50 व्या वर्षी 10 वर्षांची शिक्षा झाली. 

US Election - ज्यो बायडेन यांच्याकडून सत्तेच्या हस्तांतरणासाठी हालचाली

अहमदाबाद येथील तुरुंगात शिक्षा भोगताना भानूभाई शांत बसले नाहीत किंवा नैराश्यात गेले नाहीत. त्यांनी 8 वर्षांच्या काळात तब्बल 31 पदव्या घेतल्या. चांगल्या वर्तवणुकीसाठी त्यांना दोन वर्षे अगोदर सोडण्यात आले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर भानूभाईंना लगेच नोकरीची ऑफर मिळाली. तुरुंगात आलेल्या व्यक्तीला सहसा नोकरी मिळत नाही. पण, त्यांचे कर्तृत्व पाहून आंबेडकर विद्यापीठाने त्यांना नोकरी दिली. नोकरी करत असताना 5 वर्षांच्या काळात भानूभाईंनी आणखी 23 पदव्या मिळवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आतापर्यंत 54 पदव्या आहेत. 

भानूभाईंच्या कामगिरीची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली आहे. त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंद झाले आहे. दरम्यान, भानूभाईंनी लॉकडाऊनच्या काळात तीन पुस्तके लिहिली आहेत. यात त्यांनी तुरुंगातील अनुभव आणि विश्वविक्रमापर्यंतच्या प्रवास कसा होता, याबद्दल लिहिलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gujrat story bhanubhai patel have 51 degrees during his imprisonment and got job