US Election - ज्यो बायडेन यांच्याकडून सत्तेच्या हस्तांतरणासाठी हालचाली

us election joe biden president elect
us election joe biden president elect

वॉशिंग्टन - अमेरिेकेत राष्ट्राध्यक्ष पदाची (US Election) निवडणूक जिंकल्यानंतर ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी रविवारी सत्तेच्या हस्तांतरणाचे आणि नवीन सरकार स्थापन करण्यसाठी काम सुरू केलं आहे. यासाठी त्यांनी एक वेबसाइट लाँच केली असून ट्विटर हँडलसुद्धा अॅक्टिव्ह केलं आहे. BuildBackBetter.com नावाची वेबसाइट आणि @Transition46 नावाने ट्विटर हँडल सुरू केलं आहे. राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत असलेले ज्यो बायडेन आणि  उपराष्ट्राध्यक्ष होणार असलेल्या कमला हॅरिस (Kamla Harris) यांच्यासमोर अनेक आव्हाने असतील. त्यामध्ये कोरोनाचं संकट, आर्थिक सुधारणा, वर्णद्वेष, वातावरण बदल यांचा समावेश आहे. 

ज्यो बायडेन यांनी आधीच म्हटलं होतं की, जनतेनं त्यांना कोरोनाच्या संकटातून वाचवणं आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मत दिलं आहे. राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच पहिल्याच दिवसापासून यावर काम सुरू करण्यात येईल. देशात कोरोनाने 2.36 लाख जणांचा मृत्यू झाला असून तो आटोक्यात आणू असा दावाही बायडेन यांनी केला होता. 

शनिवारी अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले. डेमोक्रेटिक पार्टीकडून ज्यो बायडेन यांनी 290 इलेक्टोरल मते मिळवली तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 मते मिळाली. या विजयासह ज्यो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. तर कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती होणार आहेत. 

आपलं राजकारण हे न संपणारी लढाई नाही. देशासाठी काम करणं हाच आपल्या राजकारणाचा उद्देश आहे. समस्या सोडवणं हे आपलं काम आहे. न्याय मिळवून द्यायचा आहे. सर्वांना समान अधिकार देणं आणि लोकांचे जीवनमान उंचावण्याचं काम करायचं आहे. आम्ही प्रतिस्पर्धी अस शकतो पण शत्रू नाही. आम्ही अमेरिकन आहोत असंही ज्यो बायडेन यांनी म्हटलं होतं. 

ट्विटरवरून ज्यो बायडेन यांनी म्हटलं होतं की, तुम्ही मला अमेरिकेसारख्या महान देशाचं नेतृत्व करण्यासाठी निवडलं यासाठी मी तुमचा आभारी आहे. पुढचं काम कठीण असेल पण मी तुम्हाला वचन देतो की जरी तुम्ही मला मत दिलं नसलं तरी सर्व अमेरिकन लोकांसाठी राष्ट्राध्यक्ष बनेन.

ज्यो बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयस्क राष्ट्राध्यक्ष आहेत. 20 नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस असून ते 78 व्या वर्षात पदार्पण करतील. 20 जानेवारी 2021 रोजी ज्यो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. यावेळची अमेरिकेची निवडणूक अनेक बाबींनी वेगळी ठरली आहे. कोरोनाच्या काळात निवडणूक पार पडली. यामध्ये चीन, कोरोना, वर्णद्वेष, वातावरण बदल या मुद्द्यांवर निवडणूक गाजली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com