दोन ट्रकच्या भीषण धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू, 16 जखमी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

दोन्ही ट्रक समोर समोर आल्यानं धडक झाली. ट्रकमध्ये असलेले काही लोक धडकेनंतर ट्रकखालीच चिरडले गेले तर काही बाजूला पडल्यानं बचावले.

अहमदाबाद - गुजरातमधील वडोदरा इथं भीषण अपघात झाला असून दोन ट्रकच्या धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. 

वडोदरा क्रॉसिंग हायवेवर बुधवारी सकाळी हा अपघात झाला. दोन्ही ट्रक समोर समोर आल्यानं धडक झाली. ट्रकमध्ये असलेले काही लोक धडकेनंतर ट्रकखालीच चिरडले गेले तर काही बाजूला पडल्यानं बचावले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिनी ट्रकमधून काही लोक निघाले होते. धडक झालेल्या दोन ट्रक पैकी एक गुजरातमधील तर दुसरा ट्रक राज्याबाहेरील असल्याचे समजते. मोठ्या ट्रकने मिनी ट्रकला धडक दिली. यामध्ये मिनी ट्रकचा चक्काचूर झाला आहे. 

हे वाचा - वडिलांची तक्रार करण्यासाठी 11 वर्षीय मुलगी 10 किलोमीटर चालली; कारण वाचून येईल राग

दुर्घटनेनंतर घटनास्थळावर जखमींचा आक्रोश सुरू होता. स्थानिकांनी पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर प्रशासकिय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची माहिती घेण्यासाठी अधिकारी रुग्णालयात पोहोचले आहेत. 

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विजय रुपाणी म्हणाले की, वडोदरा इथं अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याचं ऐकून दु:ख झाले. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून आवश्यक ती सर्व मदत पोहचवण्यास सांगितले आहे. जखमी लोक लवकर बरे होवोत आणि मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gujrat vadodara road accident truck hit mini truck