esakal | मोदींच्या आधी माझे बाबा पोहचले होते; रुपाणींच्या मुलीची FB पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींच्या आधी माझे बाबा पोहचले होते; रुपाणींच्या मुलीची FB पोस्ट

फेसबुक पोस्ट लिहिताना 'एका मुलीच्या नजरेतून विजय रुपाणी' अशी सुरुवात त्यांनी आहे.

मोदींच्या आधी माझे बाबा पोहचले होते; रुपाणींच्या मुलीची FB पोस्ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुका असलेल्या काही राज्यात भाजपने वर्षभरात अनेक बदल केले आहेत. मंत्रिमंडळात फेरबदलाशिवाय मुख्यमंत्रीही बदलण्याचे निर्णय भाजपने घेतले. गुजरातमध्येही विजय रुपाणी यांच्या जागी आता भुपेंद्र पटेल यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली आता आगामी विधानसभा लढवली जाणार आहे. दरम्यान, रुपाणींचा राजीनामा आणि भुपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केल्याने काही नेते नाराज असल्याची चर्चाही सुरु आहे. आता विजय रुपाणी यांच्या मुलीने फेसबुक पोस्टमधून भाजपला सुनावलं आहे.

रुपाणी यांची मुलगी राधिका यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, '२००२ मध्ये जेव्हा अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला होता तेव्हा मोदींच्या आधी माझे बाबा तिथं पोहोचले होते.' फेसबुक पोस्ट लिहिताना 'एका मुलीच्या नजरेतून विजय रुपाणी' अशी सुरुवात त्यांनी आहे. राधिका यांनी लिहिलं की, खूप कमी लोकांना माहिती आहे की, कोरोना आणि तौक्ते चक्रीवादळाच्या आपत्तीत माझे बाबा मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत जागे रहायचे आणि लोकांच्या समस्या सोडवायचे. त्यासाठी सतत फोनवरून ते संपर्कात राहत होते.

अनेक लोकांना एवढं माहिती आहे की, माझ्या वडिलांचा प्रवास हा एक कार्यकर्ता म्हणून सुरु झाला आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचला. पण माझ्या वडिलांची सुरुवात तर १९७९ च्या मोरबी पूर, अमरेली ढगफुटी, कच्छ भूकंप, स्वामीनारायण मंदिरावर दहशतवादी हल्ला, गोध्राची घटना, बनासकांठा महापूर यापासून झाली. तौक्ते चक्रीवादळ ते कोरोनाचं संकट या सगळ्यात बाबांनी झोकून काम केलं.

हेही वाचा: LJP खासदार प्रिन्स यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा

लहानपणीची आठवण सांगताना राधिका म्हणाल्या की, आम्हाला ते फिरायला घेऊन जात नव्हते. चित्रपट पाहण्यासाठी न नेता ते एखाद्या कार्यकर्त्याकडे घेऊन जायचे. जेव्हा स्वामी नारायण अक्षरधाम मंदिरावर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा तिथं पोहचणारी पहिली व्यक्ती माझे बाबा होते. नरेंद्र मोदींच्या आधी ते मंदिर परिसरात पोहोचले होते.

बाबांचा स्वभाव शांत आणि मितभाषी आहे आणि त्यामुळेच त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण झाली. राजकीय नेत्यांनी संवेदनशील असू नये का? नेत्यांमध्ये असा गुण असायला नको का? त्यांनी कठोर पावलं उचलली आहेत. जमीनीसाठीचा कायदा असेल, लव्ह जिहाद असेल किंवा गुजरातमध्ये दहशतवाद नियंत्रणासाठीचे निर्णय असतील. त्यांच्या कठोर निर्णयाची ही उदाहरणे आहेत असे म्हणत त्यांच्या मितभाषी स्वभाववर टीका करणाऱ्यांना राधिका यांनी उत्तर दिलं आहे.

हेही वाचा: एक लाख नोकऱ्या लवकरच, भाजप मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

माझे बाबा नेहमी सांगतात की राजकारण आणि नेत्यांची प्रतिमा चित्रपट आणि आधीपासूनच्या समजुतीच्या प्रभावाने तयार झाली आहे. ती बदलायला हवी. रुपाणींनी कधीच गटबाजीचे समर्थन केले नाही आणि तेच त्यांचे वैशिष्ठ्य होते. काही राजकीय विश्लेषक विचार करत असतील की विजयभाईंच्या कारकिर्दीचा हा शेवट आहे. पण खरंतर विरोधापेक्षा आरएसएस आणि भाजपच्या सिद्धांतानुसार सत्ता कोणत्याही लालसेशिवाय सोडणं चांगलं आहे असेही राधिका यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

loading image
go to top