
आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला घरचा आहेर देत कार्यपद्धतीवरून टीकाही केली आहे. काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी टीका केली होती. त्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांनी निवडणुकीत होणाऱ्या पराभवावरून पक्षाला सुनावलं आहे.
नवी दिल्ली - देशात 2014 ला सत्तांतर झाल्यापासून काँग्रेसला जवळपास प्रत्येक निवडणुकीत दणका बसत आहे. अद्याप त्यांना भाजपला शह देण्यात यश आलेलं नाही. दरम्यान पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्नही सुटलेला नाही. त्यातच आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला घरचा आहेर देत कार्यपद्धतीवरून टीकाही केली आहे. काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी टीका केली होती. त्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांनी निवडणुकीत होणाऱ्या पराभवावरून पक्षाला सुनावलं आहे.
गुलाम नबी आझाद म्हणाले की, तिकिट मिळवणारे नेते ऐन प्रचाराच्यावेळी उष्णता आणि धुळीचा त्रास असल्याचं सांगत पाठ फिरवतात. त्याऐवजी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून राहणं पसंत करतात. त्यातही त्यांना डिलक्स रुम हव्या असतात असे म्हणत आझाद यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला.
नेत्यांना तिकिट मिळालं की सर्वात आधी फाइव्ह स्टार हॉटेल बूक करतात. त्यात त्यांना रूमही डिलक्स हव्या असतात. फिरायला गाडीसुद्धा एसी हवी आणि ज्या भागात रस्ते चांगले नसतात अशा ठिकाणी जायला नको म्हणतात असंही गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून निवडणुका लढवता येत नाहीत. जोपर्यंत ही संस्कृती बदलणार नाही तोपर्यंत आपण जिंकू शकणार नाही असे आझाद म्हणाले.
हे वाचा - मोदींचा मंत्र मनावर घेतला; उत्तर प्रदेशने 8 महिन्यात कमावले 138 कोटी
काँग्रेसची निवडणुकांमध्ये होत असलेली पिछेहाट आणि नेतृत्व यावरही त्यांनी टीका केली. पक्षात वरच्या पदांवर असलेल्या नेत्यांनाही आझाद यांनी सुनावलं आहे. पक्षाच्या कामगिरीवरून अनेकजण नेतृत्वाला दोष देत आहेत. पण जिल्ह्यातील नेत्यांचा सर्वसामान्यांशी असलेला संपर्क कमी झाला आहे. पद मिळालं की लेटर पॅड आणि व्हिजिटिंग कार्ड छापतात आणि काम झालं असं नेत्यांना वाटतं. पण खरं काम तर इथूनच सुरु व्हायला पाहिजे असंही आझाद यांनी म्हटलं.
हे वाचा - Good News! 'अमेरिकेत कोरोना लसीकरण कार्यक्रम डिसेंबरपासून सुरु होऊ शकतो'
पक्षाचं नेतृत्व योग्य असल्याचं आझाद यांनी म्हटलं. ते म्हणाले की, मी निवडणूक प्रभारी असताना सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली चार ते पाच राज्यांमध्ये विजय मिळवला होता. कर्नाटक, केरळ जिंकलं आणि तामिळनाडुमध्ये युती केली होती. आंध्र प्रदेशातही विजय मिळवला होता. पक्षाच्या नेतृत्वाने कधीच कामात ढवळाढवळ केली नाही असंही आझाद यांनी सांगितलं.