देशाच्या मूडनुसार चाला नाहीतर...; गुपकार आघाडीवर अमित शहा संतापले

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 17 November 2020

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर मुद्द्यावरुन बनलेल्या राजकीय मोर्चावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर मुद्द्यावरुन बनलेल्या राजकीय मोर्चावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. गुपकार आघाडीला 'गुपकार गँग' संबोधत काहींना जम्मू-काश्मीरमध्ये विदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवा आहे, असं ते म्हणाले आहे. गुपकार गँग भारताच्या तिरंग्याचा अपमान करते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी गुपकार गँगच्या अशा कृतींचे समर्थन करतात का? त्यांनी आपली भूमिका देशाच्या जनतेसमोर ठेवली पाहिजे, असं अमित शहा म्हणाले आहेत. 

ग्लोबल आघाडीला स्वीकार करणार नाही देश

शहा यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत म्हटलंय की, ''काँग्रेस आणि गुपकार गँग जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतीचे युग आणू पाहात आहेत. कलम 370 ला हटवून आम्ही दलित, महिला आणि आदिवासींना जे अधिकार दिले आहेत, ते त्यांना काढून घ्यायचे आहेत. याच कारणासाठी देशभर त्यांना नाकारले जात आहे.'' जम्मू-काश्मीर नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारताचे लोक कधीही देश हिताविरोधात बनलेल्या अपवित्र 'ग्लोबल आघाडी'ला स्वीकार करणार नाही. गुपकार गँग देशाच्या मूडनुसार पुढे चालली तर ठिक नाहीतर त्यांना लोक बुडवतील, असं शहा म्हणालेत. 

कलम 370 हटवण्याविरोधात गुपकार आघाडीच्या नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. 11 ऑक्टोबर रोजी फारुक अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं की, चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू केले जाऊ शकते. 23 ऑक्टोबर रोजी पीडीपीच्या नेत्या महबुबा मुफ्ती म्हणाल्या होत्या की, त्या तिरंगा हातात घेणार नाही. जम्मू-काश्मीरमधील नेत्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने तिखट प्रतिक्रिया दिली होती.

काँग्रेसने मेहमुबा मुफ्ती, फारुक अब्दुल्ला यांच्यासोबत मिळून जिल्हा विकास परिषद (डीडीसी) लढण्याची योजना बनवली आहे. यावरुन भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, ''कलम 370 पुन्हा लागू करण्याची काँग्रेसची मनिषा आहे. फारुक अब्दुल्ला यांनी तर यासाठी चीनची मदत घेण्यासही तयारी दाखवली आहे.'' भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी गुपकार आघाडीचा उल्लेख 'गुप्तचर आघाडी' असा केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Gupkar Gang is going global said amit shah