'रॉबिनहूड बिहार के' गुप्तेश्वर पांडेंचा व्हिडिओ व्हायरल; राजकारणात एन्ट्रीचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत बिहार पोलिसांची एन्ट्री झाल्यानंतर महासंचालक गुप्तेश्वर पांडे चर्चेत होते. गुप्तेश्वर पांडेय यांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करताना मुंबई पोलिसांवर टीका केली होती.

नवी दिल्ली - बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी स्वेच्छानिवृत्ती घेतली. अर्ज केल्यानंतर त्यांना लगेच सेवामुक्त करण्यात आले. बिहारचे माजी पोलिस महासंचालकांवर बिगबॉसमधील कंटेस्टंट दीपक ठाकुरने गाणं तयार केलं आहे. रॉबिनहूड बिहार के असं नाव असलेलं गाणं मंगळवारी रात्री सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलं आहे. गुप्तेश्वर पांडे यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर ते राजकारणात उतरणार अशी चर्चा आहे. व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर अनेकांनी ते वातावरण तयार करत असल्याचं म्हटलं आहे. खरंतर गुप्तेश्वर पांडे यांनी याआधीही राजकारणात येण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र भाजपकडून तिकिट न मिळाल्यानं त्यांनी पुन्हा पोलिस सेवेत परतण्याचा निर्णय घेतला होता. 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत बिहार पोलिसांची एन्ट्री झाल्यानंतर महासंचालक गुप्तेश्वर पांडे चर्चेत होते. गुप्तेश्वर पांडेय यांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करताना मुंबई पोलिसांवर टीका केली होती. तसंच बिहारमधील तपास पथक मुंबईत आल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. तेव्हाही गुप्तेश्वर पांडे यांनी बीएमसीला टार्गेट केलं होतं. याशिवाय रिया चक्रवर्तीबाबतही त्यांनी अनेक वक्तव्ये केल्यानं चर्चेत आले होते. 

हे वाचा - मोदींसोबत शाहीनबागच्या 'दादी'देखील आहेत 'टाइम'च्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत

गाण्याच्या व्हिडिओमध्ये गुप्तेश्वर पांडे अनोख्या आणि दबंग स्टाइलमध्ये दिसून आले. गुप्तेश्वर पांडेय यांच्या भीतीने गुन्हेगार देवाची प्रार्थना करायला लागतात असं या गाण्यातून सांगण्यात आलंय. गुप्तेश्वर पांडे हे जनतेचे हिरो, बिहारचे रॉबिनहूड असल्याचे म्हणत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती आणि व्हिडिओतून करण्यात आलेलं कौतुक यावरून गुप्तेश्वर पांडे राजकारणात उतरण्याचे संकेत असल्याचं म्हटलं जात आहे. 

आता मी मुक्त मनुष्य आहे. मी काही पोलीस महासंचालक नाही. जीवंत असेपर्यंत मी लोकांची सेवा करीत राहीन. समाजसेवेपुरते बोलायचे झाल्यास राजकारणात न उतरता सुद्धा मी ती करू शकतो.
- गुप्तेश्वर पांडे 

24 तासांत मंजुरी; अटही शिथिल
वास्तविक पांडे येत्या पाच महिन्यांत निवृत्त होणार होते, पण त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. मग त्या अर्जावर 24 तासांच्या आत कार्यवाही झाली. तीन महिन्यांच्या नोटिशीची अटही शिथिल करण्यात आली. राज्यपाल फागू चौहान यांनी मंगळवारी त्यांचा विनंती अर्ज मान्य केला. पांडेय यांच्यानंतर एसके सिंघल यांची बिहारच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gupteshwar pandey bihar ke robinhood video song viral