esakal | बिहार निवडणूक - माजी DGP गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला माजी पोलिस कॉन्स्टेबल
sakal

बोलून बातमी शोधा

Gupteshwar-Pandey

बिहारच्या निवडणुकीत तिकीट मिळविण्यात एका माजी पोलिस कॉन्स्टेबलने राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांच्यावर मात करून उमेदवारी मिळविली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पांडे यांना निवडणुकीच्या रणांगणाच्या पहिल्या टप्प्यातच कॉन्स्टेबलकडून हार पत्करावी लागेल, असे कधी वाटलेही नसेल.

बिहार निवडणूक - माजी DGP गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला माजी पोलिस कॉन्स्टेबल

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार

बिहार निवडणूक
पाटणा - Bihar Election 2020 बिहारच्या निवडणुकीत तिकीट मिळविण्यात एका माजी पोलिस कॉन्स्टेबलने राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांच्यावर मात करून उमेदवारी मिळविली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पांडे यांना निवडणुकीच्या रणांगणाच्या पहिल्या टप्प्यातच कॉन्स्टेबलकडून हार पत्करावी लागेल, असे कधी वाटलेही नसेल.

निवडणुकीत नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी पांडे यांनी नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. एखाद्या ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी त्यांना खात्री होती. यासाठी त्यांना बक्सर आणि शाहपूर या दोन जागांचा पर्याय होता. पण या दोन्ही ठिकाणी भाजपचा दावा होता. बक्सरसाठी नितीश कुमार यांनी शेवटपर्यंत दबाव ठेवला होता. पण भाजपने तेथून कॉन्स्टेबलपदाची नोकरी सोडून भाजपला समर्थन देणाऱ्या परशुराम चौबे यांना उमेदवारी बहाल केल्याने पांडे यांचे नाव मागे पडले. पांडे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन बक्सरमधून त्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत उतरविण्याचे नितीश कुमार यांच्या मनात होते. पण भाजप नेतृत्वावर चौबे यांना तिकीट देण्यासाठी दबाव होता.

इस्लामिक स्टेटच्या संपर्कातील दोघे ताब्यात; 14 जणांना पाठवले सीरियाला 

‘माझे जीवन जनतेसाठी समर्पित’ 
भाजपने बक्सरमधून परशुराम चौबे यांना उमेदवारी दिल्यानंतर गुप्तेश्‍वर पांडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून ते निराश नसल्याचे सांगितले आहे. आपल्या हितचिंतकांनीही निराश होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. यंदा निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. मी आयुष्यात मोठा संघर्ष केला आहे. माझे जीवन बिहारी जनतेसाठी समर्पित आहे. माझी जन्मभूमी असलेल्या बक्सरला आणि सर्व जाती-धर्मातील माझे सर्व मोठे बंधू-भगिनी, माता यांच्यापुढे मी नतमस्तक आहे,  अशी भावनिक पोस्ट पांडे यांनी केली आहे.

Edited By - Prashant Patil