‘एचएएल’ची नवी झेप; प्रतिकूल हवामानात हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

भारतीय हवाई दलाने संरक्षण संपदेच्या विकासामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी वेगाने पावले उचलायला सुरुवात केली.

बंगळूर - भारतीय हवाई दलाने संरक्षण संपदेच्या विकासामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी वेगाने पावले उचलायला सुरुवात केली असून हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) विकसित केलेल्या वजनाला हलक्या अशा बहुउपयोगी हेलिकॉप्टर्सनी पहिली परीक्षा पास केली आहे. हिमालयामध्ये उष्ण आणि अतिशय वेगाने बदलणाऱ्या हवामानामध्ये तब्बल दहा दिवस या हेलिकॉप्टरनी विविध प्रकारच्या कसरती केल्याचे सूत्रांनी सांगितले.

लेहमध्ये या चाचण्या पार पडल्याचे समजते, ज्या ठिकाणी या चाचण्या घेण्यात आल्या ते ठिकाण समुद्रसपाटीपासून ३३०० मीटर उंचीवर आहे. हे हेलिकॉप्टर इंटरनॅशनल स्टॅंडर्ड ॲटमॉस्फेअरच्या +३२० अंश सेल्सिअसमध्ये उड्डाण करू शकते. या चाचण्यांमध्ये हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची क्षमता, त्याची कामगिरी आणि उड्डाणाचा दर्जा या सगळ्या गोष्टींचा कस लागतो.

लडाखमध्ये भारताच्या दौलत बेग ओल्डीसारख्या हवाईतळांवर या हेलिकॉप्टरचा वापर अधिक प्रभावी ठरू शकतो. या तळाची उंची ही समुद्रसपाटीपासून पाच हजार मीटर एवढी आहे असे एचएएलकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

हे वाचा - नंदनवनातील हिमनद्या वेगाने वितळताहेत!

क्षमता सिद्ध केली
सियाचीनमधील हिमशिखरामध्ये अतिशय उंचावर या हेलिकॉप्टरनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. या चाचण्यांदरम्यान वैमानिकांनी अतिशय उंचावर उभारण्यात आलेल्या अमर आणि सोनम येथील हेलिपॅडवर या हेलिकॉप्टरचे यशस्वीरीत्या लँडिंग करून दाखविले. आपण देखील आपल्या देशामध्ये उच्च मारक क्षमता असणारे हेलिकॉप्टर तयार करू शकतो हे एचएएलने दाखवून दिल्याचे निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HAL Light Utility Helicopter completed hot and high altitude trials in Himalayas