esakal | धक्कादायक! भर बाजारात मिळाला भाजप आमदाराचा लटकलेला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

पश्चिम बंगालच्या दिनाजपूर बाजारात भाजप आमदाराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे.

धक्कादायक! भर बाजारात मिळाला भाजप आमदाराचा लटकलेला मृतदेह

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

कोलकाता- पश्चिम बंगालच्या दिनाजपूर बाजारात भाजप आमदाराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे हेमताबादचे आमदार देबेंद्र नाथ रॉय यांचा मृतदेह सोमवारी सकाळी एका दुकानाच्या बाहेर लटकलेल्या अवस्थेत मिळाला.  पश्चिम बंगाल भाजपने आमदाराची हत्या झाल्याचा दावा केला आहे. ही घटना जेथे झाली तेथून आमदाराचे घर एक किलोमीटर अंतरावर आहे. 

Breaking:सचिन पायलटच म्हणतात, 'काँग्रेस सरकार धोक्यात'
देबेंद्र नाथ यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार, काही लोक रात्री 1 च्या सुमारास त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी देबेंद्र यांना घराबाहेर बोलावलं आणि त्यांना घेऊन गेले. सोमवारी सकाळी स्थानिक लोकांनी त्यांचा मृतदेह बाजारात लटकलेल्या अवस्थेत पाहिला. लोकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

पश्चिम बंगाल भाजपने याबाबत ट्विट केलं आहे. उत्तर दिनाजपूरच्या आरक्षित जागेचे हेमताबादचे भाजप आमदार देबेंद्र नाथ यांचा मृतदेह त्यांच्या बिंदल गावाजवळ संदिग्धपणे लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. लोकांचं स्पष्ट म्हणणं आहे की, त्यांची अगोदर हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना लटकवण्यात आले. त्यांचा गुन्हा काय होता? त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. ओम शांति, असं भाजपने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ENG vs WI : पाहुण्या विंडीज संघाचा इंग्लंडवर विजय
भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी या घटनेची निंदा करत पश्चिम बंगालच्या ममता सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत ममता सरकारवर टीका केली आहे. निंदनीय आणि भ्याडपणाचे कृत्य !!! ममता बॅनर्जी यांच्या राज्यात भाजप नेत्यांच्या हत्येचं सत्र थांबत नाहीये. सीपीएमसोडून भाजपमध्ये आलेले हेमताबादचे आमदार देबेंद्र नाथ रॉय यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह फाशी देऊन लटकवण्यात आला. भाजपमध्ये येणे हाच त्यांचा गुन्हा होता का?, असं ते म्हणाले आहेत. 

दरम्यान, हेमताबाद उत्तर दिनाजपूर जिल्ह्यामध्ये येते. देबेंद्र नाथ 2016 मध्ये सीपीएमच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणाच्या तपासाची मागणी होत आहे.