esakal | हनुमानाचा जन्म नेमकं कुठं झाला? कर्नाटक-आंध्रप्रदेशमध्ये जुंपली

बोलून बातमी शोधा

hanuman cartoon
हनुमानाचा जन्म नेमकं कुठं झाला? कर्नाटक-आंध्रप्रदेशमध्ये जुंपली
sakal_logo
By
कार्तिक पुजारी

बंगळूर- भगवान हनुमानाच्या जन्मस्थानाबाबत आजही देशभरातील धर्मशास्त्राचे संशोधक आणि अभ्यासक विविध मते मांडताना दिसतात. आता तिरूपती देवस्थान समितीने येथील प्रसिद्ध तिरुमला टेकड्या याच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. या दाव्याला पुष्टी देणारा एक ग्रंथ देखील देवस्थान समितीकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. देवस्थानच्या या दाव्याला कर्नाटकमधील धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी आक्षेप घेतला आहे. सध्या बळ्ळारीला लागून असणारे हम्पी हेच पूर्वीचे किष्किंधा क्षेत्र असून तेथेच वानरांचे राज्य अस्तित्वात होते, असे त्यांचे म्हणणे आहे. या वादामुळे कर्नाटक आणि आंध्रप्रदेश ही दोन राज्ये आमनेसामने आली आहेत. देवस्थान समितीने म्हटले आहे की, ‘‘ सध्या तिरूमलाचे जे सात डोंगर अस्तित्वात आहेत, त्यापैकी एकावर हनुमानाचा जन्म झाला होता. आम्ही हा दावा पुराव्यानिशी केला असून त्यासंदर्भातील एक ग्रंथ देखील लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. विशेष म्हणजे याच डोंगरावर व्यंकटेश्‍वर स्वामींचा देखील निवास आहे.’’ पुरातत्वशास्त्राचे अभ्यासक आणि इतिहास संशोधकांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. कर्नाटकमधील विश्‍व हिंदू परिषदेने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘‘ तिरूपती देवस्थान समितीने कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अभ्यासक आणि धर्माचार्यांसोबत चर्चा करायला हवी होती. हम्पी किंवा विजयनगर साम्राज्याच्या राजधानीला लागून असलेला परिसर हाच किष्किंधा क्षेत्र होय याबाबत अभ्यासकांमध्ये एकमत आहे.’’

हेही वाचा: ममता बॅनर्जींचं गांधी मूर्तीसमोर धरणे आंदोलन; बसल्या बसल्या चित्रेही काढली

जन्मस्थान कर्नाटकात?

हम्पी येथील अंजानाद्री हेच हनुमानाचे जन्मस्थान असून येथील खडकांवर तशा प्रकारची वर्णन करणारी काही दृश्‍ये कोरलेली आढळून आली आहेत. स्थानिक लोकांना देखील याची माहिती असल्याचे विश्‍व हिंदू परिषदेने म्हटले आहे. संगमाकल्लू, बेलाकल्लू येथील गुहांमध्ये अनेक चित्रे आढळून आली असून त्यामध्ये स्पष्टपणे हनुमानाचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते, असे येथील जाणकारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: देशात कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितली 4 कारणं

मग मूर्ती का नाही सापडल्या?

तिरूपती देवस्थानचा हा दावा बंगळूरमधील चित्रकला परिषद संस्थेतील कला इतिहास विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. राघवेंद्रराव कुलकर्णी यांनी फेटाळून लावला आहे. त्रेता युगाच्या काळामध्ये येथील लोकांनी रामाला मदत केलेली असू शकते. आजही हम्पी आणि लगतच्या परिसरामध्ये हनुमानाच्या एक हजारांपेक्षाही अधिक मूर्ती आढळून येता, तिरूमलाच्या डोंगरावर मात्र अशाप्रकारच्या कोणत्याही खाणाखुणा आढळून येत नाहीत. धारवाड विद्यापीठातील संशोधक ए. सुंदरा यांनी देखील नेमकी हीच बाब मांडली. आनेगुंडी येथे अंगदाचा शाही महाल होता असे त्यांनी म्हटले आहे.