‘हर घर तिरंगा’मुळे बचत गटांना मिळाले काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Har Ghar Tiranga latest marathi news

‘हर घर तिरंगा’मुळे बचत गटांना मिळाले काम

तापी (गुजरात) - केंद्र सरकारने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दणक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी विविध यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. केंद्राच्या ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेमुळे गुजरातच्या तापी जिल्ह्यातील आदिवासी खेड्यांतील महिला बचत गटांना नवा रोजगार मिळाला आहे.

या बचत गटांशी संबंधित असलेल्या शेकडो महिला या पाच लाख ५० हजार एवढ्या बांबूच्या काठ्या तयार करणार आहेत. या काठ्यांचा वापर राष्ट्रध्वजासाठी केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका (एनआरएलएम) मोहिमेअंतर्गत या बचत गटांना काम देण्यात आले असून या बांबूच्या काठ्यांचा नऊ जिल्ह्यांना पुरवठा केला जाणार असल्याचे तापी जिल्हा विकास अधिकारी दिनेश कपाडिया यांनी सांगितले.

तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्यामध्ये आठ आदिवासी खेडी आहेत, या सगळ्या खेड्यांना केंद्र सरकारच्या या मोहिमेमध्ये थेट सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. ‘‘सखी मंदाली’ या बचत गटाने आतापर्यंत सर्वाधिक बांबूच्या काठ्या तयार केल्या आहेत. मी सर्वप्रथम या बचतगटाला भेटलो आणि माझी कल्पना त्यांना सांगितली तेव्हा त्यांनी तिचा आनंदाने स्वीकार केला. आता या बचत गटाशी संबंधित असणाऱ्या शेकडो महिलांनी पाच लाखांपेक्षाही अधिक बांबूच्या काठ्या तयार करण्याचा संकल्प केला आहे,’’ असे कपाडिया यांनी स्पष्ट केले.

चार ते पाच रुपयांना एक काठी

‘हर घर तिरंगा’ या मोहिमेसाठी राज्यातील आठ ते नऊ जिल्ह्यांनी या बांबूच्या काठ्यांची मागणी नोंदविली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या काठ्या उपलब्ध करून दिल्या जातील. प्रत्येक काठीसाठी चार ते पाच रुपये एवढी किंमत आकारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शेकडो महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. या बचत गटांना कच्चा मालाची खरेदी करण्यासाठी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

राष्ट्रध्वजाचे वितरण करणार

खेड्यांमध्ये देखील ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम उत्साहात राबविण्यात येणार आहे, त्यासाठी अन्य दहा बचतगटांना राष्ट्रध्वजाच्या वितरणाचे काम देण्यात आले आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहीम (एनआरएलएम) राबविते. ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलनासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. आता मोहिमेच्या माध्यमातूनच बचत गटांना नवी कामे देण्यात आली आहेत.

Web Title: Har Ghar Tiranga Got Work For Self Help Groups Benefit To Tribal Villages In Tapi District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..