
भाजपात प्रवेश करणार का? हार्दिक पटेल यांनी दिलं उत्तर
नवी दिल्ली : गुजरातमधील तरुण नेता हार्दिक पटेलने काँग्रेसला (Hardik Patel Resigned Congress) रामराम ठोकला आहे. त्यानंतर हार्दिक कोणत्या पक्षात प्रवेश करणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तसेच ते भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची देखील माहिती होती. त्यामुळे हार्दिक भाजपमध्ये जाणार का? याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
मी सध्या भाजपमध्ये जाणार नाही आणि जाण्याचा निर्णय देखील घेतलेला नाही, असं हार्दीक पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. गुजरातमध्ये पाटीदार समाज असो वा अन्य कोणताही समाज, त्यांना काँग्रेसमध्ये त्रास सहन करावा लागला आहे. काँग्रेसमध्ये खरे बोलल्यानंतर बडे नेते तुमची बदनामी करतात आणि हीच त्यांची रणनिती आहे, असंही हार्दीक पटेल म्हणाले. ते अहमदाबादेत माध्यमांसोबत बोलत होते.
फक्त 7-8 लोक 33 वर्षांपासून काँग्रेस चालवत आहेत. माझ्यासारखे कार्यकर्ते रोज 500-600 किमी प्रवास करतात. मी लोकांमध्ये जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर येथील बडे नेते एसीमध्ये बसून माझे प्रयत्न उधळून लावतात. गुजरातमध्ये फक्त हार्दिक पटेल एकटा नाराज नाही, तर काँग्रेसचे अनेक आमदार नाराज आहेत. त्यांनी लक्षात ठेवावं, की बड्या नेत्यांची स्तुती केली म्हणजे पक्ष त्यांना मुख्यमंत्री करेल असे नाही, असा इशाराही त्यांनी नाराज काँग्रेस नेत्यांना दिला आहे.
कंटाळा आल्यावर लोक काँग्रेसला मतदान करतील, अशी पक्षात चर्चा आहे. मी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याशी बोललो होतो. तसेच गुजरातच्या समस्या देखील त्यांना सांगितल्या होत्या. पण, त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. मी दुःखाने नव्हेतर धैर्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असंही हार्दिक पटेल म्हणाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं. यामधून काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.