बॅरिकेड तोडून शेतकरी घुसले हरियाणात, पोलिसांच्या अंगावर घातला ट्रॅक्टर 

टीम ई सकाळ
Thursday, 31 December 2020

ट्रॅक्टर अडवणाऱ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जयपूर - कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. दरम्यान, राजस्थान - हरियाणा सीमेवरील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं पोलिसांना अश्रूधुराचा मारा करावा लागला. राजस्थानमधील शेतकऱ्यांचा एक गट राजस्थान हरियाणा सीमेवर शाहजहानपूरमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होता. जवळपास 12 हून अधिक ट्रॅक्टरने हरियाणा पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडले आणि हरियाणामध्ये प्रवेश केला. 

शाहजहानपूर इथं शेतकरी आंदोलनावेळी पोलिसांशी वादही झाला. यावेळी ट्रॅक्टर अडवणाऱ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही ट्रॅक्टर बॅरिकेड तोडून दिल्लीच्या दिशेने निघून गेले. 

दरम्यान, पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिस ट्रॅक्टर अडवण्यासाठी आले असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचे प्रयत्न झाले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्जही केला. यातूनही काही ट्रॅक्टर बॅरिकेड तोडून सीमेच्या पलिकडे गेले. वातावरण चिघळायला लागल्यानंतर आणि शेतकरी आक्रमक झाल्यानं शेवटी पोलिसांनी अश्रूधुराचा आणि पाण्याचा मारा केला. मात्र तरीही आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा पवित्रा कायम होता. 

हे वाचा - पाकिस्तानचा 'ट्रॅप'; एअरफोर्स स्टेशनमधील एकाला अटक

दिल्लीच्या सिंघु सीमेवर शेतकरी गेल्या 36 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांनी कडाक्याच्या थंडीतही आंदोलन सुरूच ठेवलं आहे. आंदोलक शेतकऱ्यांना जेवण, खाणं याशिवाय इतर सुविधाही अनेकांनी पुरवल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मोबाइलला नेटवर्क नसल्यानं त्यांच्यासाठी सीमेवर वायफायची सुविधाही पुरवली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारसोबतच्या चर्चेतून अद्याप म्हणावा तसा तोडगा निघालेला नाही. आता पुढची बैठक नव्या वर्षात 4 जानेवारीला होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana police and farmers fight on border tear gas and water cannon use