पाकिस्तानचा 'ट्रॅप'; एअरफोर्स स्टेशनमधील एकाला अटक

टीम ई सकाळ
Thursday, 31 December 2020

पाककडून सातत्याने हनी ट्रॅपच्या माध्यमातून भारतातील माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. 

लुधियाना - पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत असल्याच्या संशयावरून पंजाबमध्ये एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पाककडून सातत्याने हनी ट्रॅपच्या माध्यमातून भारतातील माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. अद्याप या प्रकरणामध्ये हनीट्रॅप आहे की नाही हे उघड झालेले नाही. मात्र संबंधित व्यक्तीला पाकिस्तानसाठी काम करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

लुधियानाचे ग्रामीण एसएसपी चरणजीत सिंह सोहल यांनी सांगितलं की, हलवर एअरफोर्समधील एक कर्मचारी राम सिंहवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करण्याच्या आरोपावरून लुधियानाच्या सुधर भागातून त्याला अटक केली आहे. चरणजीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामसिंहचे दोन साथीदार फरार झाले आहेत. रामसिंह हा हलवर एअरफोर्समध्ये स्टेशनमध्ये डिझेल मेकॅनिक म्हणून काम करतो.

हे वाचा - केंद्राने कृषी कायदे मागे घ्यावेत; भाजप आमदाराने प्रस्तावाला दिला पाठिंबा

याआधी ऑक्टोबर महिन्यात राजस्थान एटीएसच्या टीमने रात्री 1 च्या सुमारास बाडमेरच्या बीजराड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटक केली होती. त्याचे नाव रोशनदीन असं होतं. काही दिवसांपूर्वी तो गुप्तचर संस्थेच्या टार्गेटवर होता. त्याच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारत माला प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामावर रोशनदीन काम करत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram singh arrested for allegedly working for Pakistan ISI