hathras case: ''दलित मुलीचा बलात्कारानंतर खून होतो, पण मोदींचा एकही शब्द नाही''

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 6 October 2020

कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅलीसाठी हरियानात दाखल होण्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

पतियाळा- कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅलीसाठी हरियानात दाखल होण्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. हाथरस बलात्कार-हत्या प्रकरणी मोदींनी एकही शब्द उच्चारला नाही असा दावा त्यांनी केला. देशासाठी लाठी खाण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला.

ते म्हणाले की, एका महिलेचा बलात्कारानंतर खून होतो. उत्तर प्रदेशातील संपूर्ण प्रशासन तिच्या कुटुंबाला लक्ष्य करते, पण पंतप्रधान एकही शब्द बोलत नाहीत हे धक्कादायक आहे.

...म्हणूनच गेलो

पिडीतेच्या कुटुंबाला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला. त्याचा संदर्भ देत राहुल म्हणाले की, ज्यांना मुली आहेत त्यांना या प्रकरणातील अन्याय समजेल. तुम्हाला मुलगा आहे, त्याचा खून होतो आणि तुम्हाला घरात कोंडून ठेवले जाते अशी नुसती कल्पना करा. इथे जिल्हा दंडाधिकारी धमकावतात. तोंड उघडू नका असे दरडावतात. राहुल गांधी परत जातील, पण उत्तर प्रदेश सरकार इथेच आहे असे त्यांनी तुम्हाला सांगितले तर...अशावेळी त्या कुटुंबाला एकाकी वाटू नये म्हणूनच मी तेथे गेलो. दररोज हजारो महिलांवर बलात्कार होतो. असा लैंगिक झळ झालेल्या देशातील लाखो महिलांच्या बाजूने मी आहे.

व्हाइट हाऊसमध्ये पोहोचताच ट्रम्पनी काढला मास्क; रुग्णालयातून परतल्यानंतर दिली प्रतिक्रिया

धक्के खाऊ, लाठीही खाऊ...

मोदी सरकारने कोंडी करून संपूर्ण देशाला झोडपले आहे. अशावेळी मला ढकलले तर काही आकाश कोसळत नाही. देशाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. हे सरकार असे आहे की, तुम्ही त्यांच्या विरोधात उभे ठाकताच ते तुम्हाला ढकलून देतात, असे सांगून ते हिंदी-इंग्लिशमध्ये म्हणाले, धक्का खा लेंगे, लाठी खा लेंगे, जो अनइमॅजीनेबल धक्का लगा, वो उस परिवार को लगा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras case congress leader rahul gandhi criticize narendra modi