esakal | हाथरस प्रकरणः गृह सचिवांनी पीडित कुटुंबाची घेतली भेट, रात्री केलेल्या अंत्यसंस्कारावर मात्र मौन
sakal

बोलून बातमी शोधा

Avanish Awasthi

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन राजकारण परमोच्च शिखरावर पोहोचले आहे.

हाथरस प्रकरणः गृह सचिवांनी पीडित कुटुंबाची घेतली भेट, रात्री केलेल्या अंत्यसंस्कारावर मात्र मौन

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन राजकारण परमोच्च शिखरावर पोहोचले आहे. याचदरम्यान उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक आणि अपर मुख्य सचिव यांनी शनिवारी हाथरसचा दौरा केला. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक हितेशचंद्र अवस्थी आणि गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अवनीशकुमार अवस्थी यांनी हाथरसमध्ये पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीचा पहिला अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. त्यानंतरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस अधीक्षकांसह पाच पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचे सांगितले. पीडित मुलीवरील रात्री केलेल्या अंत्यसंस्काराबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर मात्र अवस्थी यांनी मौन बाळगत तेथून काढता पाय घेतला. 

बिहार निवडणूक आखाड्यात युवा वारसदार; नेत्यांची पुढील पिढी अजमावणार नशीब

अवनीश कुमार अवस्थी पत्रकार परिषदेत म्हणाले की, संपूर्ण प्रकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीने आपले काम सुरु केले असून पीडित कुटुंबीयांपैकी काहींचे जबाब घेण्यात आले आहे. एसआयटीची पहिला अहवाल शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता सरकारला मिळाला. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सायंकाळी दोन तासांच्या आतच पोलिस अधीक्षकांसह पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. 

एसआयटीची चौकशी सुरु आहे. ते त्यांचे काम करत आहेत. त्याचबरोबर कुटुंबीयांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्याची नोंद घेण्यात आली आहे. एसआयटी त्या दृष्टीने काम करेल. प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अवस्थी म्हणाले. परंतु, पीडित मुलीवर रात्री अंत्यसंस्कार का केले असा पत्रकारांनी अवस्थी यांना सवाल केला. पण त्यांनी त्यावर काहीच भाष्य केले नाही आणि पत्रकार परिषद सोडून निघून गेले.