जुने विरोधक एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात औत्सुक्‍य 

वृत्तसंस्था
Sunday, 15 November 2020

गेल्या काही महिन्यांच्या कालावधीतील त्यांच्या भेटीची ही चौथी वेळ आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. HD Kumaraswamy meets Chief Minister B. S. Yeddyurappa

बंगळूर - मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यात राजकीय विळ्या- भोपळ्याचे वैर असूनही हे दोन्ही नेते शुक्रवारी भेटले. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीतील त्यांच्या भेटीची ही चौथी वेळ आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. 

कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान कावेरी येथे त्यांची भेट घेतली. 2011 मध्ये सत्ता वाटणीच्या कराराचा भंग झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकाविरुध्द कडवट भूमिका घेतली होती. 20 महिने मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या कुमारस्वामी यांनी उर्वरित 20 महिने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला होता. अलीकडच्या काळात दोन्ही नेते किमान तिनदा भेटले. गेल्या विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेसने सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावात धजदने भाग घेतला नाही. कॉंग्रेस पक्ष एकाकी पडल्याने अविश्वास ठराव गमवावा लागला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुमारस्वामी यांच्या रामनगर मतदारसंघातील विकास योजनांना मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात अनुदान मंजूर केले. धजदने इतर विकासात्मक योजनांचाही फायदा करून घेतला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डी.के. शिवकुमार हे वक्कलीग नेते असल्याने राज्यातील वक्कलीग समाजाची मते कॉंग्रेसकडे वळतील, अशी भिती कुमारस्वामींना वाटते, असे राजकीय निरिक्षकांचे मत आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कुमारस्वामींनी कॉंग्रेस आणि शिवकुमार यांच्यावर टीका करण्याची संधी कधीच गमावली नाही. 1999 मध्ये एस. एम. कृष्णा, वक्कलीग मुख्यमंत्री असताना धजदच्या बाजूने असलेल्या वक्कलीगांनी कॉंग्रेसचे समर्थन केले. या पाठिंब्याच्या पुनरावृत्तीची चिंता धजदला आहे. अशा परिस्थितीत कुमारस्वामी यांच्या पाठिंब्याने येडियुरप्पा यांना पुन्हा बळकटी मिळणार आहे. येडियुरप्पांच्या भाजपांतर्गत विरोधकांनाही त्यामुळे वचक बसणार आहे. 

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या भेटीमागे विशेष अर्थ नाही. मंड्या डीसीसी बॅंक निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी कुमारस्वामी यांनी भेट घेतली होती. या शिवाय अन्य कोणत्याच विषयावर चर्चा झाली नाही. या भेटीला वेगळा अर्थ लावणे योग्य नाही. 
- मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HD Kumaraswamy meets Chief Minister B. S. Yeddyurappa