esakal | काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांच्यासारखा विचार करत नाहीत - केंद्रीय मंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांच्यासारखा विचार करत नाहीत - केंद्रीय मंत्री

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योजल्या जात असलेल्या उपाय योजनांचा उल्लेख करत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. आता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या पत्राला उत्तर देताना काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी मनमोहन सिंग यांना लसीकरणाचे महत्त्व समजते. परंतु, त्यांच्या पक्षाचे इतर नेते त्यांच्या विचारांशी सहमत नसतात, असा टोला लगावला आहे.

हर्षवर्धन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनाविरोधात लढताना लसीकरणाचे महत्त्व मनमोहन सिंग जाणतात. पण हे अत्यंत दुर्दैवी आहे की, त्यांच्याच पक्षाचे जबाबदार पदावर असलेले नेते मात्र त्यांच्या मताशी सहमत नसतात. हे अत्यंत दु:खद आहे की, काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या शास्त्रज्ञ आणि लस उत्पादकांचे आभार मानण्यासाठी एक शब्दही काढला नाही. विकसनशील देश असतानाही दोन लस असणे भारतासाठी अभिमानाची गोष्ट नाही का ?, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे अनेक नेते लसीबाबत खोट्या बातम्या पसरवतात आणि लोकांच्या जिवाशी खेळत राहतात. काही काँग्रेस नेत्यांनी तर सार्वजनिकरित्या लसीवर टीका केली आणि स्वतः गूपचूप लस घेतली, असेही त्यांनी म्हटले.

मनमोहन सिंग यांनी आपल्या पत्रात काय म्हटलं होतं ?

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून लसीकरणाची मोहीम तीव्र करण्याचा सल्ला दिला होता. या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. किती लोकांना लस दिली आहे. यावर लक्ष केंद्रीत न करता लोकसंख्येच्या किती टक्के लोकांचे लसीकरण झाले याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वात आधी सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी लसीच्या किती ऑर्डर दिल्या आहेत, त्या कशा पद्धतीने राज्यांना वितरित केले जाणार आहेत, याबाबत सांगितले पाहिजे.

हेही वाचा: कोरोनाला कसं हरवायचं? मनमोहन सिंगांनी पत्र लिहून PM मोदींना दिले 5 सल्ले

सरकारने हे सांगितले पाहिजे की, ज्यांनी सहा महिन्यांत डिलिव्हरी करण्याचा शब्द दिला आहे, अशा वेगवेगळ्या लस उत्पादकांना किती ऑर्डर दिले आहेत. जर आपल्याला निश्चित संख्येतील लोकांचे लसीकरण करायचे असेल तर आपल्याला अडव्हान्समध्ये योग्य प्रमाणात ऑर्डर दिल्या पाहिजेत म्हणजे उत्पादकांना वेळेवर त्याची पूर्तता करता येईल.