कोरोनानंतर कान्हा शांती वनममधील हार्टफुलनेसला पुन्हा येतोय बहर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heartfulness in Kanha Shanti Vanam

कोरोनानंतर कान्हा शांती वनममधील हार्टफुलनेसला पुन्हा येतोय बहर

हैदराबाद - ध्यान धारणा करताना हृदयात शांती, आनंद आणि त्यासोबत जगण्याची नवी उमेद निर्माण करणाऱ्या हैदराबाद जवळील कान्हा शांती वनमच्या हार्टफुलनेस या ध्यान केंद्राला कोरोनानंतर पुन्हा बहर आला आहे. देश, विदेशातील हजारो तरुण, अबालवृद्ध पुन्हा एकदा या ध्यान केंद्राकडे वळत आहेत. यामुळेच नुकत्याच झालेल्या एका सहज ध्यानासाठी आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला तब्बल 40 हजाराहून अधिक जणांनी हजेरी लावली होती. तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रोज असंख्य नागरिक येथील सहज ध्यान शिकण्यासाठी येताना दिसत आहेत.

कान्हा शांती वनम हे हैदराबादच्या सीमेवर आणि तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्याच्या, चेगुर गावालगत सुमारे 1 हजार 500 एकर परिसरात वसलेले आहे. एकाच वेळी सुमारे एक लाखांहून अधिक लोकांना मोठ्या गोल तंबूत ध्यान करता येते. त्यामुळे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र म्हणून हार्टफुलनेस ध्यान केंद्राची ओळख बनली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये याची केंद्र असून जगभरात 160 देशांममध्ये या संस्थेमार्फत कार्य सुरू आहे. येथे जगभरात आध्यात्मिक गुरू दाजी म्हणून ज्यांची ओळख आहे ते कमलेश पटेल, हे हार्टफुलनेसचे मुख्य मार्गदर्शक आहेत, त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोफत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ध्यानधारणा शिकवली जाते. दाजी यांनी सहजध्यानाच्या माध्यमातून आत्तापर्यंत लाखो लोकांना जगण्याची एक नवी उमेद आणि ओळख निर्माण करून दिली आहे. ते या ध्यानाच्या माध्यमातून ते यौगिक आध्यात्मिक पद्धतींचे सार शास्रोक्त पद्धतीने मांडतात, त्याचे महत्त्व विषद करत असतात.

सहजमार्ग आणि ध्यानपद्धती

सुरुवातीला 1945 साली श्री रामचंद्र मिशनच्या माध्यमातून राजयोगावर आधारित एक सोपी ध्यानपद्धती विकसित करण्यात आली होती. तिला सहजमार्ग किंवा नैसर्गिक मार्ग असेही म्हणतात. पुढे त्याच पद्धतीला दाजी यांनी हार्टफुलनेस नावाने विकसित केले असून आज जगभरातील तब्बल 160 देशांमध्ये असलेल्या केंद्रातून याविषयी प्रशिक्षक ध्यान धारणा शिकवत असल्याची माहिती देण्यात आली.

जुलैमध्ये 50 हजारांचा भरणार मेळा

हार्टफुलनेसमध्ये वर्षात चार वेळा ध्यानाच्या भंडाऱ्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यात 31 एप्रिल, 28 सप्टेंबर, 24 जुलै आणि 2 फेब्रुवारीला हे कार्यक्रम होतात. त्यात 28 सप्टेंबर रोजी दाजी यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे लाखो साधक आणि 160 देशातील प्रतिनिधी येथे येतात. कोरोनामुळे मागील दोन वर्षात ते कार्यक्रम होऊ शकले नव्हते मात्र आता 24 जुलै रोजी पुन्हा एका मोठा कार्यक्रम होत असून त्यासाठी देश विदेशातील सुमारे 50 हजाराहून अधिक साधक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजयोगावर आधारित असलेली सहज पद्धती आणि त्याच्या माध्यमातून ध्यान आणि जगण्याचे महत्त्व पटवून देतो.त्यातून त्यांना आत्मबळ मिळते. त्यांच्या जीवनात खूप मूलगामी बदल होतात. नकारात्मकता कमी होण्यास खूप मदत होते. त्यासोबत लोकांना निसर्ग, पर्यावरण आणि त्यासाठीचे महत्त्व लक्षात आणून देतो. यासाठीच अत्यंत कोरड्या, नापीक असलेल्या जमिनीवर आम्ही नंदनवन फुलवला आहे. लोक पाहून त्या मार्गाने चालण्याची प्रेरणा घेतात.

- दाजी उर्फ कमलेश पटेल, (अध्यात्मिक गुरू) प्रमुख : हार्टफुलनेस, कान्हा शांती वनम, हैदराबाद.

Web Title: Heartfulness In Kanha Shanti Vanam Spiritual Guru Daji

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusHyderabad
go to top