दक्षिण भारतातही पावसाचे थैमान; पुरात 31 बळी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

मदतीसाठी पंतप्रधानांना विनंती : राहुल गांधी

वायनाड जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर आहे. खासदार व कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी केरळमधील पूरपरिस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून दिली. वायनाडसह राज्यातील पूरग्रस्त भागासाठी मदतीची विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली.

तिरुअनंतपुरम : दक्षिणेकडील केरळ, कर्नाटकध्ये पावसाने थैमान घातले असून, पूरस्थिती गंभीर आहे. केरळमध्ये बळींचा आकडा 22 पर्यंत पोचला आहे. कर्नाटकमध्ये पावसामुळे नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. अनेक जण बेपत्ता आहेत. बळींची संख्या वाढण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

हवामान विभागाने केरळ, तसेच पश्‍चिम किनारपट्टीवर शुक्रवारी सकाळी "रेड अलर्ट' दिला आहे. तमिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यात पावसामुळे पूर आला आहे. मदतकार्यासाठी राज्य सरकारने हवाई दलाला विनंती केली आहे. केरळ, कर्नाटकाचा सागरी व दक्षिण किनारा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे पुढील दोन दिवसांत मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या भागात पूरस्थिती असून, अनेक नद्या धोक्‍याच्या पातळी ओलांडून वाहत आहे. अरबी समुद्र आणि पश्‍चिमी किनाऱ्यावर प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने मच्छीमारांना दिला आहे. 

केरळात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने मदत व बचाव कार्यासाठी लष्कर आणि हवाई दलाची मदत घेत असल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले. मल्लपूरममध्ये दरड कोसळून 50 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आले. खराब हवामानामुळे तिथे मदतकार्यात अडथळा येत असल्याचे सांगण्यात आले.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाड जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वायनाडमध्ये आतापर्यंत 260 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुरामुळे रस्ते खचल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. मेप्पाडी येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कुटुंबातील बेपत्ता सदस्य व नातेवाइकांच्या शोधासाठी नागरिकांची रीघ रुग्णालयांकडे लागली आहे. 

मदतीसाठी पंतप्रधानांना विनंती : राहुल गांधी

वायनाड जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर आहे. खासदार व कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी केरळमधील पूरपरिस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून दिली. वायनाडसह राज्यातील पूरग्रस्त भागासाठी मदतीची विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली.

केरळमधील स्थिती 

- नऊ जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा 
- एकूण 44 नद्यांपैकी निम्म्या दुथडी भरून वाहत आहेत 
- राज्यात दरडी पडल्याच्या 24 घटना 
- सर्व शैक्षणिक संस्थाना सुटी जाहीर 
- एक लाख 24 हजार नागरिकांची सुटका करून त्यांनी निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. 
- कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ रविवारी दुपारी तीन पर्यंत बंद राहणार आहे. 
- कोची नौदलाचा तळाचा वापर तात्पुरत्या विमानतळ म्हणून करण्यासाठी चर्चा सुरू 
- पूरबाधित जिल्ह्यांच्या मदतीसाठी नौदलाची अतिरिक्त पथक तैनात 
- रेल्वेसेवा विस्कळित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in Southern India 31 Peoples Died