
राजस्थान, बिहारमध्ये दमदार पाऊस
नवी दिल्ली - देशात उशिराने दाखल झालेल्या पावसाने अनेक राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारच्या पाटण्यात पावसाने काल हजेरी लावली. गेल्या चोवीस तासात बिहारमध्ये वीज पडून झालेल्या विविध दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या पूर्व भागात दहा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत जोरदार पाऊस झाला आहे.
जयपूरमध्ये मुसळधार पावसामुळे गाड्या पाण्यावर तरंगत आहेत. दुसरीकडे गुजरातमध्ये मुसळधार पावसाच्या शक्यतेने रेड ॲलर्ट जारी केला आहे. मध्य प्रदेशच्या बुंदेलखंड, बघेलखंह येथेही पाऊस होत आहे. काल विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जयपूर येथील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोटाच्या लाडपुरा येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचवेळी कोटा शहरात १०९ मिलिमीटर पाऊस पडला.
जयपूर येथे रस्त्यावर पाणी आले असून अनेक गाड्या तरंगत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बिहारमध्ये गेल्या दोन दिवसांत चांगला पाऊस झाला आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गोपालगंज येथे तीन, भोजपूर येथे दोन, लखीसराय, सीवान आणि कटिहार येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर, बुंदेलखंड, बघेलखंड येथे पाऊस पडत आहे. नर्मदा, ताप्ती आणि शिप्रा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
Web Title: Heavy Rains In Rajasthan Bihar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..