ओडिशा, तेलंगणला पावसाने झोडपले

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 15 October 2020

हैदराबादेत रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस आणि प्रशासनाला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

हैदराबाद/भुवनेश्‍वर - ओडिशा आणि तेलंगण येथे मुसळधार पाऊस पडत असून हैदराबाद येथे गेल्या चोवीस तासात २० सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तसेच घरावर दगड कोसळून भिंत पडल्याने दोन महिन्याच्या बाळासह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन जण जखमी झाले.  हैदराबादेत रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी पोलिस आणि प्रशासनाला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशाच्या गजपती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे १२ गावांत पाणी शिरले असून तेथील ५०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगण आणि ओडिशातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. ग्रेटर हैदराबाद म्यून्सिपल कॉर्पोरेशन (जीएचएमसी) ने म्हटले की, एलबी नगर येथे २५ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील चोवीस तासातही पाऊस कायम राहण्याची शक्यता देखील वर्तविली आहे. नागरिकांनी अकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेत आहेत. अनेक घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.बंडलगुंडा भागात घराची भिंत पडून नऊ जणांचा  मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपराष्ट्रपतींकडून शोक
उपराष्ट्रपती वेंकया नायडू यांनी तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशातील मुसळधार पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्धल शोक व्यक्त केला आहे. स्थानिक अधिकारी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नायडू यांनी ट्विटरवरून केले आहे. 

तेलंगणातील स्थिती
  वनस्थलीपूरम, दम्मईगुडा, अट्टापूर मेन रोड, मुर्शिराबाद भागात पाणी
    टोली चौकी भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
    वनस्थलीपूरम (जि. रंगारेड्डी) येथील आगम्य नगर, बँक कॉलनी, हकिमबाद, साईनाथ कॉलनी, गंदेश नगरातील घरे पाण्यात
    हैदराबादच्या बंडलगुडा येथे भिंत कोसळून नऊ जणांचा मृत्यू. एका बाळाचा समावेश
    हैदराबादच्या अनेक भागात चोवीस तासात २० सेंटीमीटर पावसाची नोंद

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains Odisha and Telangana