
उच्च न्यायालयाचा निकाल ‘मशिदीवर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार नाही’
अलाहाबाद : मशिदीवर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकार नाही, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. अजानच्यावेळी मशिदींमध्ये भोंगे लावण्यासंबंधी बदायूँ येथील एकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने हा मूलभूत अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. ‘मशिदींत लाऊडस्पीकर लावणे हा कायद्यानुसार घटनात्मक अधिकार नाही,” असे न्या. विवेक कुमार बिर्ला आणि न्या. विकास बधवार यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावताना म्हटले आहे.
न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला. अजानच्यावेळी मशिदीत भोंगे लावण्याची परवानगी बिसौली तालुक्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी नाकारली होती. त्या आदेशाला बदायूँ जिल्ह्यांतील इरफान यांनी आव्हान दिले. धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या वापरावरून अनेक राज्यांमध्ये वाद निर्माण झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा आवाज परिसराबाहेर ऐकू नये, असे म्हटले होते.