काँग्रेसचे जी-२३ गटातील नेते सक्रिय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Himachal Assembly Election

काँग्रेसचे जी-२३ गटातील नेते सक्रिय

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नाराजीमुळे हातचे राखून असलेले असंतुष्ट जी-२३ गटातील नेते आता नेतृत्व बदलानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात सक्रिय झाले आहेत. जी-२३ गटाचे नेते मानले जाणारे आनंद शर्मा, मनीष तिवारी हिमाचल प्रदेशाच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत.

राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर आक्षेपाबद्दलचे २३ नेत्यांच्या सहीचे पत्र पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना लिहिल्यामुळे जी-२३ गट म्हणून चर्चेत आलेल्या आनंद शर्मा, मनीष तिवारी, भूपिंदरसिंग हुडा, पृथ्वीराज चव्हाण या जी-२३ गटाच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उमेदवारीसाठी प्रस्तावक बनून हातमिळवणीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता या नेत्यांची पक्षाच्या कामकाजातही सक्रियता वाढली आहे.

प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांकडून योग्य तो सन्मान दिला जात नसल्याचे कारण देत आनंद शर्मा यांनी ऑगस्टमध्ये सुकाणू समितीचा राजीनामा दिला होता. एवढेच नव्हे तर प्रचारापासून दूर राहणार असल्याचेही संकेत दिले होते. मात्र, आता ते सक्रिय झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच डून विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला. तसेच ते पत्रकार परिषदा घेत असून त्यानंतर राज्यभरात प्रचार करणार असल्याचे काँग्रेसमधून सांगण्यात आले.

तर, अग्नीवीर योजनेवर काँग्रेसच्या भूमिकेविरोधात मोदी सरकारचे समर्थन करणारे आणि आपली नाराजी दर्शविणारे मनीष तिवारी यांनीही खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभागी होऊन मतभेद मिटल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला होता. आता ते देखील हिमाचल प्रदेशात आशाकुमारींच्या प्रचाराला पोचले. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आशा कुमारी या डलहौसी मतदारसंघातील उमेदवार असून त्यांचा प्रचार मनीष तिवारी यांनी केला.

दरम्यान, काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी हिमाचल प्रदेशात प्रचार सुरू केला असला तरी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी असलेले राहुल गांधी या राज्यात प्रचाराला जाणार काय? याबाबत पक्षात अद्याप स्पष्टता नाही. तर, हिमाचलची जबाबदारी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी घेतली असून उमेदवारी वाटपापासून ते प्रचारापर्यंत सर्व निर्णय प्रक्रियेवर त्यांचे नियंत्रण असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या नुकत्याच दोन प्रचारसभाही झाल्या आहेत. काँग्रेसने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रचारावर भर दिला आहे.