
- कारमधील वस्तू आणि रक्कम नेली चोरून.
- पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली तक्रार.
चंदीगड : हिमाचल प्रदेशच्या परिवहनमंत्र्यांच्या पत्नीचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना घडली. गोविंद ठाकूर असे संबंधित मंत्र्याचे नाव आहे. त्यांची पत्नी रजनी ठाकूर या चंदीगडच्या सेक्टर-8 मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान ही चोरी झाली.
रजनी ठाकूर यांचे वाहनचालक गाडीतच बसून होते. त्यावेळी चोरांनी त्या वाहनचालकाला तुमचे पैसे खाली पडले आहेत, असे खोटे सांगितले. त्यानंतर वाहनचालक गाडीबाहेर आला. याचाच फायदा घेत चोरांनी कारमधील वस्तू आणि रक्कम चोरून नेली. या गाडीमध्ये रजनी ठाकूर यांची बॅग होती. या बॅगेमध्ये तब्बल अडीच लाख रुपये रोख आणि काही दागिने होते. चोरट्यांनी फसवून ही बॅग लंपास केली. या घटनेनंतर रजनी ठाकूर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, या तक्रारीनंतर पोलिसांनी वाहनचालकाची अधिक चौकशी केली असता त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. आता पोलिसांचा तपास त्यादृष्टीने सुरु आहे.