हिमाचलला ‘डबल इंजिन’ हवेच; पंतप्रधान नरेंद्र मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Himachal Pradesh Assembly Election 2022 himachal pradesh need Stable and strong govt pm narendra modi politics

हिमाचलला ‘डबल इंजिन’ हवेच; पंतप्रधान नरेंद्र मोदी

चांबी/सुजानपूर : हिमाचल प्रदेशला स्थिर व सशक्त अशा ‘डबल इंजिन’ सरकारची गरज आहे, असे प्रतिपादन करत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. काँग्रेस अस्थिरता, भ्रष्टाचार व गैरव्यवहाराशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला. हिमाचलमधील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या कांगरा जिल्ह्यात पंतप्रधानांनी सभा घेतली. त्यानंतर, सुजानपूरमधील सभेतही त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. केंद्रात सत्ता असताना काँग्रेसने हिमाचलचा विश्वासघात केला. हा पक्ष विकासाचा शत्रू असल्याचा आरोप त्यांनी केला. (Himachal Pradesh Assembly Election 2022)

पंतप्रधान पुढे म्हणाले, की मी पंतप्रधान झाल्यानंतरही काँग्रेसने हिमाचलच्या प्रगतीत अडथळे निर्माण केले आहेत. राज्यात २०१७ पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे, हिमाचलच्या विकासासाठी राज्यात सत्तेत राहणे ही भाजपची गरज आहे. काँग्रेसने लष्करप्रमुखांचा अपमान करून जवानांची तुलना गुंडांशी केल्याचा आरोपही त्यांनी केला. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबाबतही काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशाची आणि सैनिकांची सुरक्षा भाजपसाठी सर्वांत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.

ते पुढे म्हणाले, की हिमाचलमध्ये सत्ता कायम राखण्यात काँग्रेसच भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. काँग्रेस हिमाचलमध्ये पुन्हा सत्तेवर आल्यास विकासाला खीळ बसेल. हिमाचलमध्ये नागरिकांनी भाजपला निवडून देण्याचा निर्धार केला आहे. देशात केवळ राजस्थान व छत्तीसगडमध्येच काँग्रेसच सत्तेत आहे. या राज्यांतून कधी विकासाच्या बातम्या ऐकल्या आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. या राज्यांतील अंतर्गत कलहाचे वृत्तच येते. देशातील नागरिकांमध्ये काँग्रेसबद्दल एवढा राग आहे, की अनेक दशकांनंतर काँग्रेसचा पराभव केल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसला निवडून देत नाहीत.

गरिबांसाठीची धोरणे आणि सुशासनासाठी भाजपची लोकांमध्ये ओळख आहे. त्यामुळेच, मतदार भाजपला पुन:पुन्हा निवडून देत आहेत. केवळ भाजपच आपण काय करू शकतो हे सांगून सर्वशक्तीनिशी आश्वासनांची अंमलबजावणी करतो. इतर पक्ष मतपेढीचे राजकारण व स्वत:च्या घराण्यातच गुंतले आहेत.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान