Himachal Pradesh assembly election : पुनरागमनासाठी भाजप उत्सुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Himachal Pradesh assembly election voting today bjp vs congress politics

Himachal Pradesh assembly election : पुनरागमनासाठी भाजप उत्सुक

सिमला : हिमाचल प्रदेशमध्‍ये राबविलेल्या विकासाचे धोरणामुळे पुन्हा सत्तेवर येण्याची आशा सत्ताधारी भाजपला वाटत आहे तर राज्यात चार दशकांपासून चालत आलेल्या प्रस्थांपितांविरोधी परंपरेचे पालन करीत मतदान करण्याचे आवाहन काँग्रेस मतदारांना करीत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा मतदारसंघासाठी शनिवारी (ता.१२) मतदान होणार आहे. हिमालयाच्या पर्वतराजीने वेढलेल्या या राज्यातील ५५ लाखांपेक्षा जास्त मतदार मुख्यमंत्री जयराम ठाकूर, माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांचे पुत्र विक्रमादित्यसिंह आणि भाजपचे माजी प्रमुख सत्यपालसिंह सत्ती यांच्यासह ४१२ उमेदवारांचे भवितव्य उद्या ठरविणार आहेत. राज्यात विधानसभेचे ६८ मतदारसंघ आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडविला होता. ‘भाजपचे चिन्ह ‘कमळ’साठी मिळणारे प्रत्येक मत माझी ताकद वाढवेल,’ असे वैयक्तिक आवाहन मोदी मतदारांना भाषणांतून करीत होते. भाजपचे अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपसाठी अनेक जाहीर सभा घेतल्या व निवडणूक बैठकाही घेतल्या.

‘आप’ अस्तित्वहीन

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपविरुद्ध काँग्रेस असा दुरंगी लढतीत आता तिसरा पर्याय आम आदमी पक्षा (आप)च्या रूपाने निर्माण झाला आहे. पण दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत त्यांचा प्रचार निःशब्दच ठरला आहे.

घरोघरी प्रचार महत्त्वपूर्ण

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता.१०) भाजप आणि काँग्रेसने बहुमत मिळण्याचे आणि सरकार स्थापन करणार असल्याचे दावे केले आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते शेवटच्या दिवशी घरोघरी जाऊन केलेला प्रचार निवडणुकीच्या निकालात महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

प्रियांका गांधी यांच्यावर मदार

विरोधी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची मदार प्रामुख्याने पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांच्यावर होती. गेल्या दोन निवडणुकांमध्ये कामगिरी फारशी चांगली कामगिरी करू न शकलेल्या काँग्रेससाठी यावेळी भाजपपासून हिमाचल प्रदेश हिरावून घेणे हा अस्तित्वाचा प्रश्न झाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने २४ वर्षांत यावेळी प्रथमच काँग्रेसला गांधी घराण्याव्यतिरिक्त अध्यक्ष मिळालेला आहे. तसेच पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी येथील प्रचाराकडे पाठ फिरवलेली होती. या पार्श्‍वभूमीवर प्रियांका गांधी यांचा करिष्मा राज्यात दिसणार का?, याबाबत उत्सुकता आहे.

भाजपसाठी सबकुछ मोदी

भाजपने हिमाचल प्रदेशमधील निवडणूक जिंकणे हे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी भूषणावह आहे. राज्यातील प्रचारात मोदी यांनी ‘प्रस्थापित समर्थक’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला होता. सत्ताधाऱ्यांना निवडून देण्याचा राज्याचा इतिहास आहे. हिमाचलमध्ये भाजपला यश मिळाल्यास राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या हिंदी भाषिक राज्यांसह नऊ राज्यांत पुढील वर्षांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि २०२४मधील लोकसभा निवडणुकीत पक्षाचे बळ वाढण्यास मदत मिळणार आहे.

१२ नोव्हेंबर - मतदान

सकाळ ८ ते सायंकाळी ५ - मतदानाची वेळ

८ डिसेंबर - निकाल

७,८८४ - एकूण मतदान केंद्रे