हिंदू कॉलेज झाले 200 वर्षांचे

यूएनआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

मूळ हिंदू कॉलेजची स्थापना ही 1817 मध्ये झाली. त्यानंतर 1855 मध्ये त्याचे नाव प्रेसेडन्सी कॉलेज असे झाले तर 2010 मध्ये त्याचे नामकरण प्रेसेडन्सी विद्यापीठ असे झाले असून त्याच्या शैक्षणिक दर्जाची ख्याती सातासमुद्रापार पोचली आहे.

कोलकता - हिंदू कॉलेज ते प्रेसेडन्सी विद्यापीठ अशी विविध नामावलीचा प्रवास करणारे येथील हिंदू कॉलेज यंदा आपल्या स्थापनेची दोनशे वर्षे पूर्ण करीत असून 20 जानेवारीला होणाऱ्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमासाठी एक हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे.

स्थापनादिनाच्या कार्यक्रमाला पाच जानेवारीला सुरवात झाली आहे. आत्तापर्यंत या कॉलेजचे तीनदा नावही बदलण्यात आले आहे. मूळ हिंदू कॉलेजची स्थापना ही 1817 मध्ये झाली. त्यानंतर 1855 मध्ये त्याचे नाव प्रेसेडन्सी कॉलेज असे झाले तर 2010 मध्ये त्याचे नामकरण प्रेसेडन्सी विद्यापीठ असे झाले असून त्याच्या शैक्षणिक दर्जाची ख्याती सातासमुद्रापार पोचली आहे. दोनशे वर्षांच्या इतिहासात या विद्यापीठाने काळानुसार आपल्यात अनेक शैक्षणिक बदलही केले असून 21 व्या शतकानुसार आता शिक्षण देण्यात येत आहे.

या हिंदू कॉलेजच्या स्थापनेला 20 जानेवारीला दोनशे वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त पाच जानेवारीपासून कार्यक्रम सुरू झाले आहेत. येत्या 20 ला होणाऱ्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमासाठी एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, ज्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी सभागृहाच्या बाहेर लावण्यात येणाऱ्या स्क्रीनवर स्थापना दिवसाचा थेट कार्यक्रम पाहता येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे या वेळी भाषण होणार आहे, असे संस्थेचे सचिव बिवास चौधरी यांनी सांगितले. गेल्या वर्षी सहा डिसेंबरला संगीत रजनीच्या कार्यक्रमाद्वारे हिंदू कॉलेजच्या स्थापनेच्या 200 वर्षाच्यानिमित्त वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली आहे.

राज्य सरकार विद्यापीठाला आपली मदत यापुढेही कायम चालू ठेवेल. विद्यापीठात नवीन शैक्षणिक सुविधा सुरू करण्यासाठी राज्य सरकार दहा एकर जागा देणार आहे.
- पार्थ चॅटर्जी, शिक्षणमंत्री

Web Title: Hindu College completes 200 years