'तरुणांनी धरावी नथुरामची वाट'; हिंदू महासभेने सुरु केलं 'गोडसे स्टडी सर्कल'

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 11 January 2021

नथुराम गोडसेचे देशात अनेक समर्थक आहेत.

भोपाळ- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. अशा महात्म्याचा नथुराम गोडसेने (Nathuram Godse) गोळ्या घालून हत्त्या केली होती. नथुराम गोडसेचे देशात अनेक समर्थक आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या काही समर्थकांनी गोडसे स्टडी सेंटर (अभ्यास मंडळ) सुरु केले आहे. 

हिंदू महासभेने  (Hindu Mahasabha) हा कार्यक्रम सुरु केला असून या माध्यमातून ते नथुराम गोडसेच्या देशभक्तीच्या गोष्टी सांगणार आहेत. हिंदू महासभा गोडसेच्या कार्याची ओळख करुन देणार आहे, तसेच त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी लोकांना संकल्प देणार आहे. ग्वालियरच्या दौलतगंज येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात गोडसे कार्यशाळा (Godse Study Center ) सुरु करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हिंदू महासभेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी गोडसेसह वीर सावरकर, रानी लक्ष्मीबाई आणि संघाशी संबंधी पदाधिकाऱ्यांच्या फोटोंचे पूजन केले आणि त्यांना श्रद्धासुमन अर्पित केले. भूतकाळातील महापुरुषांबाबत नव्या पिढीला माहिती करुन देता यावी, यासाठी कार्यशाळा सुरु करण्यात आल्याचं हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. महाराना प्रताप यांचा इतिहासही तरुणांना शिकवला जाणार आहे.  

रहस्यमयी तलाव! पाण्याला स्पर्श करताच प्राणी दगडामध्ये बदलतात

काहींच्या म्हणण्यानुसार महात्मा गांधी यांच्या हत्त्येची तयारी ग्वालियरमध्ये करण्यात आली होती आणि हत्त्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल तत्कालीन सिंधिया राज्याच्या चिन्हाचे होते. दरम्यान, हिंदू महासभा दरवर्षी नथुराम गोडसेचा बलिदान दिवस आणि जन्मदिवस साजरा करते. काही वर्षापूर्वी हिंदू महासभेने आपल्या कार्यालयात गोडसेची प्रतिमा स्थापित केली होती. पण वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी प्रतिमा जप्त केली. आता सभेने गोडसे स्टडी सर्कल सुरु केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindu Mahasabha opened Godse Study Center at its office in Gwalior Nathuram Godse