सुझूकीच्या 'सुसाट' एस्टीम कारचा इतिहास

शशांक पाटील
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

भारतात सामान्यांसाठी असणाऱ्या गाड्यात एक अशीही गाडी होती, जिची किंमत जरी सामान्य गाड्यांसारखी असली, तरी तिचा लूक आणि कामगिरी मात्र इतर गाड्यांच्या तुलनेत वेगळी होती. ती कार म्हणजे मारुती सुझुकी कंपनीची ‘एस्टीम’.

जागतिक बाजारात २५ वर्षांपूर्वी सुझुकी कंपनी अनेक प्रकारच्या गाड्या तयार करत होती; मात्र कंपनी कोणतीही खास अशी कॉम्पॅक्‍ट कार तयार करत नव्हती. भारतात मारुती उद्योग समूहाबरोबर करार करत सुझुकीने आपली पहिली गाडी मारुती ८०० भारतीय बाजारात दाखल केली होती.

ही गाडी दिसायला लहान आणि वापरायलाही अगदीच साधी होती. त्यामुळे एखादी स्पोर्टस्‌ लूक आणि आधुनिक फीचर्स असणारी गाडी भारतीयांसाठी तयार करण्याच्या दृष्टीने कंपनी काम करू लागली. १९८९ पासूनच संकेस्थळांवर मारुती ८०० चे विकसित मॉडेल ‘मारुती १०००’ या गाडीची जाहिरात कंपनी करत होते. १९९० मध्ये कंपनीने गाडी बाजारात दाखल केली; मात्र मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा यादी असल्याने कंपनीने मारुती ८०० प्रमाणेच लकी ड्रॉ काढून गाडी विकण्याचे ठरवले; मात्र गाडी महागडी असल्याने बाजारात तिला अपेक्षेइतकी मागणीच आली नाही. त्या काळात गाडीची किंमत तब्बल ३ लाख ८१ हजार होती. जी त्यावेळ च्या ९९.५ टक्के भारतीयांच्या आवाक्‍याबाहेर होती. त्यातच ९७० सीसीचे इंजिन आणि ८२५ किलो वजनाची गाडी केवळ ४६ हॉर्स पॉवर ऊर्जा निर्माण करू शकत असल्यानेही ग्राहकांचा हिरमोड झाला. त्यामुळे नवी मारुती १००० भारतीय बाजारात टिकू शकली नाही.  

मात्र यावर निराश न होता कंपनीने आणखी मेहनत करत आंतरराष्ट्रीय बाजारातील आपल्या ‘सुझुकी कल्टस’ या गाडीत काही आधुनिक बदल करून चार वर्षांनंतर १९९४ मध्ये ‘एस्टीम’ या गाडीला बाजारात दाखल केले. मारुती १००० प्रमाणेच दिसणाऱ्या नवीन इस्टीममध्ये आतील डिझाईन आणि फेब्रिकमध्ये अनेक बदल करण्यात आले होते. मात्र लूक वगळता इंजिनमध्ये कंपनीने कमालीचे बदल केले होते. ज्यामुळे गाडीचे पहिलेवहिले मॉडेल तब्बल ६५ हॉर्स पॉवरची ऊर्जा निर्माण करू शकत होते. त्यानंतर चार वर्षांनी बाजारात आलेल्या गाडीच्या दुसऱ्या पिढीतदेखील कंपनीने आधुनिक बदल केले होते. ही नवीन कार सुमारे ८५ हॉर्स पॉवरच निर्माण करू शकत होती. दोन लिटरहून कमी इंजिन असणाऱ्या गाड्‌यांत सर्वाधिक पॉवर निर्माण करू शकण्याचा मान इस्टीमने पटकावला होता.

दमदार ताकद निर्माण करण्याच्या आपल्या क्षमतेमुळे इस्टीम काही दिवसांतच भारताची रेसिंग कार झाली आणि गाड्यांच्या विविध शर्यतीत सुसाट धावू लागली. काळानुसार कंपनीने गाडीत पॉवर स्टेरिंग, पॉवर विंडोज, वातानुकूलिन यंत्रणा इत्यादी बदलदेखील केले. त्याचा परिणाम गाडीचा खप आणखी वाढला आणि बघता बघता गाडी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली. शहरांतील रस्त्यांवर सुसाट धावणारी इस्टीम सिनेमांतही दिसत होती. सुरुवातीला ९७० सीसीचे इंजिन असणारी एस्टीम नंतर १२९८ सीसीमध्येदेखील आली होती. विशेष म्हणजे १५२७ सीसी इंजिन असणारी एस्टीम बाजारात उपलब्ध होती. 

पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांत येणारी एस्टीम काळ पुढे गेला तशी मात्र मागे पडत गेली. गाडीतील जुने पार्टस्‌ हळूहळू कंपनी तयार करायचे बंद करू लागली. अखेर २०१० मध्ये गाडीचे उत्पादनही बंद करण्यात आले. दरम्यानच्या काळात आपल्या इतर गाड्यांपेक्षा वेगळ्या कामगिरीमुळे इस्टीम गाडी बाजारात मोठ्या प्रमाणात विकली गेली होती. आजदेखील भारतात ही गाडी सेंकड हॅंड विकत घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

web title : The history of Suzukis Esteem car


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The history of Suzukis Esteem car