चिमुकल्यांच्या मिठीत गरीब-श्रीमंत भेदही विरघळला; नेटकरी भावूक |Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकल्यांच्या मिठीत गरीब-श्रीमंत भेदही विरघळला; नेटकरी भावूक...
चिमुकल्यांच्या मिठीत गरीब-श्रीमंत भेदही विरघळला; नेटकरी भावूक

चिमुकल्यांच्या मिठीत गरीब-श्रीमंत भेदही विरघळला; नेटकरी भावूक...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुलं ही देवाघरची फुलं असतात, असं म्हटलं जाते. या चिमुकल्या मुलांच्या चेहऱ्यावरील गोड हास्यानं जगातील मोठ-मोठ्या दुःखाचा विसर पडतो. मुलांच्या छोट्या छोट्या कृतींपुढे जगातला कोणताच भेदाभेद टिकत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिला की याचा प्रत्यय येतो. दोन लहान मुलांचा एकमेकांना मिठी मारतानाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसतंय की, एक गरीब महिला फुगे विकत आहे. तिच्या हातात छोटा भीम, बदक अशा विविध प्रकारचे रंगेबीरंगी सुंदर फुगे असल्याचं दिसतंय. तिच्यासोबत गुडघ्यापर्यंत ढगळा टिशर्ट घातलेला आणि अनवाणी पायाचा तिचा लहान मुलगाही आहे. आपल्या फुगे विकणाऱ्या आईबरोबर असताना त्याच्याच वयाचा एक लहान मुलगा येतो. हिरव्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची चड्डी, पायात सॅण्डल घातलेला आणि आकर्षक केशरचना असलेला हा मुलगा चांगल्या घरातला असल्याचं दिसतंय. हा मुलगा त्या गरीब लहान मुलासमोर येऊन नाचू लागतो. गरीब मुलगा आणि त्याची आईही त्याच्याकडे आनंदाने पाहत असते. तो नाचत असतानाच अचानक हा मुलगा पुढे जातो आणि काही कळायच्या आतच त्या मुलाला मिठी मारतो. दुसरा मुलगाही त्याला आनंदाने मिठीत घेतो. या दृश्यांपाठी ‘यारो दोस्ती बडी ही हसीन है’ हे गाणं जोडलं आहे. हे दृश्य काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. या लहान मुलांच्या मिठीत गरीब श्रीमंत भेदाभेद कुठल्या कुठं विरून जातो. त्या गरीब मुलाची आईही हे सगळे होत असताना कौतुकानं पाहत आहे. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून भावूक झाले.

किंश देटे असे या दुसऱ्या लहान मुलाचे नाव आहे. त्याच्या आईनं ही गोड गळाभेट कॅप्चर केली आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली. ‘किआंश अयांश’ या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल २५ लाख लोकांनी पाहिला असून त्यावर १ लक्षाहून अधिक लाईक्स आणि १८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका गरीब मुलानं एका चांगल्या घरातील मुलाला मारलेल्या मिठीनं अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला.

लोक अक्षरशः या व्हिडिओच्या प्रेमात पडले आहेत. अनेक लोकांनी मुलांच्या संगोपनाचे कौतुक केलं आणि व्हिडिओतून दिलेल्या महत्त्वाच्या संदेशाबाबतही मत व्यक्त केले. "ओ माय गॉड, ही मुले त्यांच्या निरागसतेतून खूप काही सांगून जातात," अशी एकाने कमेंट केलीये तर आणखी एकाने “माय गॉड दॅट हग,” अशी कमेंट केली आहे.

loading image
go to top