कोरोना लसीपासून आपण किती दूर? जाणून घ्या जगभरातील सद्यस्थिती

कार्तिक पुजारी
शुक्रवार, 31 जुलै 2020

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या 140 पेक्षा अधिक उमेदवार लस निर्मितीच्या कामात गुंतले आहेत. यातील काही उमेदवार पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात आहेत, तर काहींनी तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली- जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असताना यावर लस कधी येईल याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. जगभरातील वैज्ञानिक कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणारी लस शोधण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या 140 पेक्षा अधिक उमेदवार लस निर्मितीच्या कामात गुंतले आहेत. यातील काही उमेदवार पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात आहेत, तर काहींनी तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. अनेक उमेदवारांनी आपली लस कोरोना विषाणूवर प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्यातील काही लसींचा आपण या लेखात आढावा घेऊ या...

कोविड -19 : देशातील मृतांचा आकडा इटलीपेक्षा अधिक
एखादी लस निर्माण करायची झाली म्हणजे चाचणीसाठी अनेक वर्षाचा कालावधी लागू शकतो. शिवाय या लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठीही काही वेळ द्यावा लागतो. मात्र, कोरोना विषाणू थैमान घालत असताना यावरील लस 12 ते 18 महिन्यात निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. लस करोडो लोकांना देणात येणार असल्याने वैज्ञानिकांना सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या 17 उमेदवार मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात पोहोचले आहेत, तर 13 उमेदवार दुसऱ्या टप्प्यात आहेत. 5 उमेदवार लसीच्या तीसऱ्या टप्प्यातील चाचणी घेत आहेत. आतापर्यंत एकाही उमेदवाराच्या लसीला सर्वसामान्यांच्या वापरासाठी परवानगी मिळालेली नाही. 

लसीची कशापद्धतीने चाचणी घेतली जाते?

मानवांवर चाचणी सुरु करण्यापूर्वी लस प्राण्यांना दिली जाते. प्राण्यांमध्ये विषाणू विरोधात प्रतिकार शक्ती निर्माण होते का, हे पाहिलं जातं. 

टप्पा पहिला- प्राण्यांवरील यशस्वी चाचणीनंतर लसीची मानवी चाचणी घेतली जाते. यात छोट्या गटाला लस दिली जाते. मानवासाठी ही लस सुरक्षित आहे का, हे यात तपासलं जातं. शिवाय प्रतिकारशक्तीला ही लस उत्तेजित करते का, हेही पाहिलं जातं. 

दुसरा टप्पा- दुसऱ्या टप्प्यात शेकडो लोकांना लस दिली जाते. यावरुन वैज्ञानिक सुरक्षा आणि लसीच्या प्रमाणाबाबत निश्चिती करतात. 

तिसरा टप्पा- या टप्प्यात हजारो लोकांना लसीचा डोस दिला जातो. यात लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत याची खात्री केली जाते. 

कोरोनाबाबत WHO चे मोठं वक्तव्य; म्हणाले...
Sinovac

चायनिज कंपनी Sinovac कोविड-19 च्या निष्क्रिय घटकांपासून लस बनवत आहे. सुरुवातीच्या दोन टप्प्यामध्ये लसीने चांगले परिणाम दाखवले असून ब्राझिलमध्ये लस तिसऱ्या टप्प्यात पोहोचत आहे.  

युनिवर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड/ AstraZeneca 

युनिवर्सिटी ऑफ ऑक्सफर्डची लस झिंपाझी विषाणूपासून दिली जाते, याला वेक्टर वॅसिन म्हटलं जातं. व्हेक्टरमध्ये जेनेटिक कोड असून यामुळे कोरोना विषाणूविरोधात रोगप्रतिकार शक्तीचा प्रतिसाद वाढतो. यूनायटेक किंगडममध्ये ही लस तिसऱ्या टप्पात गेली आहे. शिवाय नुकतेच दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलमध्ये लस तिसऱ्या टप्प्यात गेली आहे. 

बिजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेकनॉलोजी/ cansino biologics Inc.

चायनिज कंपनी cansino biologics Inc. आणि बिजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेकनॉलोजीद्वारे ही लस तयार केली जात आहे. हे इन्स्टिट्यूट चायनिज लष्कराच्या जवळचे आहे. दुसऱ्या टप्पात या लसीने चांगले परिणाम दाखवले आहेत. मात्र, चाचणीची कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. लष्करी वापरासाठी या लसीला परवानगी मिळाली आहे. मात्र, किती प्रमाणात ही वाटण्यात आली आहे याची माहिती नाही. 

मोडर्ना/ moderna

अमेरिकेची बायोटेक कंपनी मॉडर्ना लसीची निर्माती करत आहे. कंपनी संदेश वाहक RNA (mRNA)चा वापर करुन शरीरात प्रथिने तयार करणार आहे. आतापर्यंत कधीही mRNA लस तयार करण्यात आलेली नाही. मात्र, पारंपरिक लसींपेक्षा या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य असल्याचं म्हटलं जात आहे. ही लस तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून लस कोरोना विषाणूविरोधात प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

भारत बायोटेक

स्वदेशी भारत बायोटेक कंपनीची लस मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात 375 स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली आहे. त्यांच्यावरील या लसीचे काही दुष्परिणाम होत आहेत का, हे पाहिलं जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how close are we to a vaccine know about current corona virus situation