तिसरी लाट केव्हा येईल? भयानक असेल का? तज्ज्ञांनी केला उलगडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

कोरोनाची तिसरी लाट अधिक भयानक आहे का? कोरोनाची तिसरी लाट केव्हा येईल? अशा काही प्रश्नांची उत्तरं सरकारी समितीतील शास्त्रज्ञांनी दिली आहेत.

तिसरी लाट केव्हा येईल? भयानक असेल का? तज्ज्ञांनी केला उलगडा

नवी दिल्ली- देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. असे असले तरी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे नागरिकांमध्ये चिंता आहे. कोरोनाची तिसरी लाट अधिक भयानक आहे का? कोरोनाची तिसरी लाट केव्हा येईल? अशा काही प्रश्नांची उत्तरं सरकारी समितीतील शास्त्रज्ञांनी दिली आहेत. कोरोनाची तिसरी लाट आपला उच्चतम स्तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गाठेल. कोरोना नियमांचे पालन न केल्यास अशी परिस्थिती निर्माण होईल, असं 'सूत्र मॉडल' या कोविड-१९ च्या गणितीय अंदाजावर काम करणाऱ्या मनिंद्र अग्रवाल यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट निर्माण झाल्यास तिसरी लाट अधिक गतीने पसरु शकते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. (How dangerous third wave of Covid19 will be Scientist on govt panel Manindra Agarwal explains)

कोरोना रुग्णांच्या संख्येतील वृद्धीबाबत अंदाज लावण्यासाठी मागील वर्षी समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत योग्य अंदाज न लावण्याबाबात यापूर्वी टीकेला सामोरे जावे लागले आहे. अग्रवाल म्हणाले की, तिसऱ्या लाटेशी शक्यता व्यक्त करताना प्रतिपिंडांचा नाश, लसीकरण आणि नवा व्हेरियंट अशा गोष्टी लक्ष्यात घेण्यात आल्या आहेत. तिसऱ्या लाटेसंबंधी सविस्तर रिपोर्ट लवकरच जााहीर करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

अग्रवाल यांनी यासंबंधी ट्विट केले आहे. यात तीन परिस्थितींचा अंदाज बांधला आहे. पहिल्यामध्ये ऑगस्टपर्यंत जनजीवन सुरळीत होईल आणि विषाणूचा कोणताही व्हेरियंट येणार नाही. दुसऱ्या परिस्थितीत लसीकरण २० टक्के प्रभावी नसल्याचे गृहित धरण्यात आलं आहे. तिसरी परिस्थिती निराशाजनक आहे. यात, ऑगस्ट महिन्यात एक नवा व्हेरियंट जो २५ टक्के अधिक संक्रामक असेल. अग्रवाल यांनी शेअर केलेल्या ग्राफनुसार, ऑगस्टपर्यंत दुसरी लाट स्थिरावेल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तिसरी लाट 'पीक'वर असेल.

तिसऱ्या परिस्थितीच्या अंदाजानुसार, तिसऱ्या लाटेमध्ये दररोज दीड ते २ लाख रुग्णांची संख्या वाढू शकते. अग्रवाल यांच्या दाव्यानुसार तिसरी लाट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्र नसेल. नवा व्हेरियंट आल्यास तिसरी लाट अधिक वेगाने पसरु शकते. पण, तरीही दुसऱ्या लाटेपेक्षा ती निम्म्याने तीव्र असेल. लसीकरणाची गती वाढत नेल्यास, तिसऱ्या आणि चौथ्या लाटेची शक्यता कमी आहे. डेल्टा व्हेरियंट अशा लोकांना संक्रमित करत आहे जे वेगळ्या प्रकारच्या व्हेरियंटने संक्रमित होते, असं अग्रवाल म्हणाले.

टॅग्स :Coronavirus