पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचा खर्च ऐकून व्हाल थक्क!

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 22 September 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फौजिया खान यांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून २०१९ पर्यंत केलल्या परदेश दौऱ्यांवर ५१७.८२ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत दिली. पंतप्रधानांनी या काळात ५८ देशांचे दौरे केल्याचेही सांगण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फौजिया खान यांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली. मोदी यांनी निवडून आल्यावर पहिल्या वर्षी २०१४ मध्ये केलेल्या अमेरिका व जपानसह सुमारे १० देशांच्या दौऱ्यांबाबत यात माहिती नाही. यंदा नोव्हेंबरमध्येही पंतप्रधानांचे सौदी अरेबियासह दोन विदेश दौरे प्रस्तावित आहेत. मोदींच्या या दौऱ्यांमुळे द्विपक्षीय, उपखंडीय व जागतिक मुद्यांवरील भारताच्या दृष्टीकोनाबाबत अन्य देशांच्या माहितीत भर पडली असून त्यांच्याशी असलेले संबंधही मजबूत झाले आहेत. या दौऱ्यांनंतर विविध देशांबरोबर भारताचे व्यापार, गुंतवणूक, सामरिक सहकार्य, अंतरिक्ष, पर्यावरण रक्षण, संरक्षण यासह अनेक क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंध मजबूत बनले आहेत, असे मुरलीधरन यांनी सांगितले.

मोदी सरकार उलथून टाकण्यासाठी दिल्ली दंगल; चार्जशीटमध्ये दावा

जागतिक पातळीवर जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय गुन्हे व दहशतवादाविरूद्धची जागतिक लढाई, सायबर सुरक्षा, आण्विक प्रसार रोखणे आदी क्षेत्रांमधील जगाच्या कार्यक्रम पत्रिकेला प्रत्यक्षात आणण्यासाठी भारत भरीव योगदान देऊ लागला आहे व या मुद्यांवरील भारताच्या मताची दखल जागतिक पातळीवर आतापर्यंत सर्वाधिक गंभीरपणे घेतली जाऊ लागली आहे, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How much does Modi foreign tour cost Information was given in Rajya Sabha