चांगली बातमी! भारतातील पहिल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात

कार्तिक पुजारी
मंगळवार, 14 जुलै 2020

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना एक चांगली बातमी आली आहे.  भारतातील पहिल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे.

नवी दिल्ली-  कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना एक चांगली बातमी आली आहे.  भारतातील पहिल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. ऑल इंडिया इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल साईन्स (AIIMS)पाटणाकडून ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. हैदराबादमधील भारत बायोटेकने इंडियन कॉऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या(ICMR)मदतीने कोरोनावरील लस कोवॅक्सिनची (COVAXIN) निर्मिती केली आहे.

सरकारी बंगल्यावरुन प्रियांका गांधी-केंद्रीय मंत्र्यामध्ये ट्विटर वॉर
एआयआयएमएस, पाटनाने मानवी चाचणीसाठी 10 स्वयंसेवकांना निवडले असून त्यांना लसीचा डोस देण्यात येणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांवर त्याच्या होणाऱ्या परिणामांचे परिक्षण केले जाणार आहे, त्यानंतर 14 दिवसाच्या अंतराने त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. या काळात स्वयंसेवकांवर लसीचा काही दुष्परिणाम होत आहे का हे तपासले जाणार आहे. एआयआयएमएसचे अधीक्षक डॉक्टर सीएम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लस 22 ते 50 वय वर्ष असणाऱ्या निरोगी महिला आणि पुरुषांना देण्यात येणार आहेत.   

तयार करण्यात आलेली लस SARS-CoV-2 वर प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. चाचणी यशस्वी ठरली तर कोवॅक्सिनचे 20 कोटी डोस तयार करण्याची आमची तयारी आहे, असं भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. क्रिष्णा इला यांनी म्हटलं आहे. कोवॅक्सिन लस हैदराबादच्या जिनोम व्हॅली येथील उच्च कंटेनमेंट सुविधेमध्ये तयार केली जात आहे. प्राण्यांवर या लसीची चाचणी घेण्यात आली असून त्यातून सुरक्षित परिणाम दिसून आले आहेत. आता मानवी चाचणी यशस्वी ठरल्यास लोकांसाठी ही लस वरदान ठरणार आहे.

उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी झाल्यावर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 9 लाखांच्या पुढे गेला आहे. तर आतापर्यंत 24 हजारांपेक्षाही अधिक लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. अशात कोरोना लस केव्हा निर्माण होते आणि ती सर्वांसाठी केव्हा उपलब्ध होते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. कोरोना लस निर्मितीचे काम वेगाने सुरु असून आता मानवी चाचणीलाही सुरुवात झाली आहे. मात्र, ही सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला आणखीन काही कालावधी जावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहान प्रशासनाकडून केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: human trial of Indias first COVID-19 vaccine starts