esakal | अफगाणिस्तानमध्ये विमाने रोखल्याने शेकडो जण अडकले
sakal

बोलून बातमी शोधा

airport

अफगाणिस्तानमध्ये विमाने रोखल्याने शेकडो जण अडकले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : तालिबानी राजवटीपासून सुटका मिळविण्यासाठी देश सोडून जाऊ इच्छिणारे शेकडो लोक अद्यापही अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत. यामध्ये अनेक अमेरिकी नागरिकांचा समावेश असून त्यांना नेण्यासाठी आलेली चार खासगी विमाने मझार ए शरीफ येथील विमानतळावरच उभी आहेत. त्यांना तालिबानने अद्याप उड्डाणाची परवानगी दिलेली नाही.

अडकून पडलेल्या नागरिकांपैकी काही जण अमेरिकेचे असले तरी बहुतांशी लोक अफगाणीच असल्याचे मझार ए शरीफ विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या अफगाणी लोकांकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचाही दावा या अधिकाऱ्याने केला. मात्र, या लोकांची सुटका करण्यासाठी अमेरिकेवर दबाव वाढत आहे. ‘आमचे लोक विमानात बसलेले आहेत, मात्र विमान उड्डाणास परवानगीच मिळत नाही.

याचाच दुसरा अर्थ म्हणजे, अमेरिकेच्या लोकांना तालिबानने ओलिस ठेवले आहे,’ असा आरोप अमेरिकी संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीने केला आहे. या सर्वांना अफगाणिस्तानच्या बाहेर जाऊ देण्याच्या बदल्यात अमेरिकेकडून अनेक मागण्या मंजूर करवून घेण्याचा तालिबानचा डाव असल्याची शंकाही समितीने व्यक्त केली आहे.

हेही वाचा: CM योगींवर टीका; युपीच्या माजी राज्यपालांवर देशद्रोहाचा गुन्हा

मझर ए शरीफ विमानतळावरून काही काळापूर्वीच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु झाली आहेत. ही विमानेही केवळ तुर्कस्तानपर्यंतच जातात. येथे अडकून पडलेली विमाने कोणी पाठविली आणि कधीपासून ती अडकून पडली आहेत, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

सुरक्षेचे तालिबानकडून आश्‍वासन

अफगाणिस्तानात मदतकार्य करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आणि इतर संघटनांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी तालिबानने दिली असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांनी केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मदतकार्य विभागाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांनी तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल घनी बरादर याची भेट घेऊन त्याच्याकडून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे आश्‍वासन घेतले. अफगाणिस्तानमधील महिला आणि अल्पसंख्याकांना त्यांचे अधिकार देण्याचे आवाहनही ग्रिफिथ यांनी तालिबानला केले.

loading image
go to top