esakal | चक्रीवादळांचा अंदाज लवकर समजणार
sakal

बोलून बातमी शोधा

Hurricane

चक्रीवादळांचा अंदाज लवकर समजणार

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - भारतात अलीकडच्या काही वर्षांत चक्रीवादळांचे (Hurricane) प्रमाण वाढत आहे. चक्रीवादळांमुळे मोठी हानी (Loss) होते. आता, आयआयटी खड्गपूरमधील संशोधकांनी चक्रीवादळांचा लवकर अंदाज वर्तविणारी नवीन पद्धत विकसित केली आहे. संशोधकांच्या गटात जिया अल्बर्ट, विष्णूप्रिय साहू आणि प्रसाद के. भास्करन यांचा समावेश होता. हे संशोधन ‘ॲटमॉसफेरिक रिसर्च’ मध्ये नुकतेच प्रकाशित झाले. (Hurricane Forecasts will be Understood Soon)

हवामान बदल उपक्रमातंर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचेही सहकार्य यासाठी लाभले. संशोधकांनी मॉन्सूनपूर्वी तयार झालेल्या दोन आणि मॉन्सूननंतर निर्माण झालेल्या चार तीव्र चक्रीवादळांचा अभ्यास केला. सध्या समुद्राच्या पृष्ठभागावरील बदल उपग्रहामार्फत टिपून चक्रीवादळांचा अंदाज बांधला जातो. उपग्रह त्यानंतर चक्रीवादळाच्या प्रगतीवरही लक्ष ठेवतात. मात्र, या नवीन पद्धतीतून चक्रीवादळापूर्वी अगदी सुरुवातीला वातावरणीय स्तंभात निर्माण होणारे चक्रवात व हवामानातील बदल ओळखता येतात. त्यातून मॉन्सूनपूर्व व मॉन्सूनोत्तर काळात चक्रीवादळ तयार होण्यापूर्वी किमान चार दिवस अंदाज वर्तविता येईल, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. आतापर्यंत, रिमोट सेन्सिंगद्वारे चक्रीवादळांबद्दल लवकरात लवकर अंदाज बांधला जात होता. त्यात, समुद्राच्या गरम पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतरच चक्रीवादळाबद्दल असा अंदाज व्यक्त करता येता होता. नवीन पद्धतीमुळे ही दरी भरून काढता येणार आहे. समुद्रात चक्रीवादळाच्या अशा प्रकारे लवकर अंदाज वर्तविल्यामुळे प्रत्यक्ष चक्रीवादळ धडकण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी बराच वेळ मिळू शकतो. त्यामुळे, चक्रीवादळांमुळे होणारी सामाजिक - आर्थिक हानीही रोखता येऊ शकेल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा: आई-वडिलांना संसर्ग झाल्यास मिळणार देखभाल रजा; केंद्राची नवी योजना

कसा वर्तविणार अंदाज?

संशोधकांनी चक्रीवादळापूर्वी वातावरणाच्या स्तंभातील चक्रवातातील बदलाची नेहमीच्या चक्रवाताशी तुलना केली. यावेळी, उपग्रहाकडून चक्रीवादळ तयार होण्यापूर्वी समुद्राच्या पृष्ठभागावरील बदल टिपण्यापूर्वीच या पद्धतीतून चक्रीवादळाचा अंदाज अगोदर वर्तविणे शक्य असल्याचे संशोधकांना आढळले.

या चक्रीवादळांचा संशोधकांकडून अभ्यास

मॉन्सूनपूर्व चक्रीवादळे

  • मोरा (२०१७)

  • अलिया (२००९)

मॉन्सूननंतरची चक्रीवादळे

  • फालिन (२०१३)

  • वरदाह (२०१३)

  • गज (२०१८)

  • माडी (२०१३)

loading image
go to top