पतीने विभक्त झाल्यानंतरही पत्नी आणि मुलांना घरखर्चासाठी पैसे द्यावेत- हायकोर्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 4 November 2020

पतीने आपली पत्नी आणि मुलांना विभक्त झाल्यानंतरही घर खर्चासाठी पैसे द्यायला हवेत, असा निर्णय अलाहाबाद हाय कोर्टाने दिला आहे.

अलाहाबाद- पतीने आपली पत्नी आणि मुलांना विभक्त झाल्यानंतरही घर खर्चासाठी पैसे द्यायला हवेत, असा निर्णय अलाहाबाद हाय कोर्टाने दिला आहे. विभक्त झालेल्या आपल्या पत्नी आणि आपल्या मुलांप्रती पतीची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी कायम राहते, असं कोर्टाने म्हटलं आहे. 

झाशी फॅमिली कोर्टात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना अलाहाबाद कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिला. कोर्टाने पतीची याचिका फेटाळून लावत म्हटलं की, ''भारतीय समुदायात लग्नाला विशेष महत्व आहे. पालक आपल्या मुलीला सासरमध्ये अधिक प्रेम मिळेल अशी अपेक्षा ठेवून असतात. पण, जेव्हा सासरमध्ये मुलीचा छळ होतो, तेव्हा त्यांची सर्व स्वप्ने धुळीस मिळतात आणि त्यांना मोठा धक्का बसतो.''

जेव्हा पत्नी आपल्या पतीचे घर सोडते आणि आपल्या माहेरी येते, त्यावेळी पतीची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे की त्याने तिची काळजी घ्यावी. अलाहाबाद हाय कोर्टाने झाशी फॅमिली कोर्टाला निर्देश दिले आहेत की पतीने आपल्या पत्नीला आणि मुलीला दर महिन्याला 3,500 रुपयांची पोटगी द्यावी. अशवनी यादव यांनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. अशवनी यादव यांनी 29 सप्टेंबर 2015 मध्ये ज्योती यादव यांच्याशी लग्न केले होते. यावेळी त्यांच्या लग्नासाठी जवळजवळ 15 लाखांचा खर्च आला होता. 

ज्योती यांनी काही वर्षानंतर पतीविरोधोत तक्रार दाखल केली होती. हुंड्यासाठी पती त्रास देत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्यानंतर 28 जानेवारी 2019 मध्ये ज्योती आपल्या पतीचे घर सोडून आपल्या माहेरी आल्या. त्यानंतरही पतीने पत्नीच्या आई-वडिलांकडे कार देण्याची मागणी चालूच ठेवली होती. त्यानंतर ज्योती यांनी आयपीसी 125 अंतर्गत खटला दाखल केला. झाशी कोर्टाने पती अशवनीला आपल्या पत्नीला 2500 आणि आपल्या मुलीला 1000 रुपये पोटणी देण्याचा आदेश दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband should give maintenance allowance to wife and kids even after separation