Hyderabad election: हैदराबादच्या निजामाची का केली जाते बदनामी?

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 1 December 2020

ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

हैदराबाद- ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अनेकवेळा निजामाचे नाव घेण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सभेत बोलताना हैदराबादमधून निजाम संस्कृती संपवली जाईल, असं वक्तव्य केलं होतं. निवडणूक प्रचारादरम्यान तत्कालीन शासकाची प्रतिमा खराब केल्याचं म्हणत हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांचे नातू मीर नजफ अली खान यांनी नेत्यांवर टीका केली आहे.

नजफ अली खान म्हणाले की, जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा मतांसाठी निजामाचे नाव बदनाम केले जाते. नेते माझ्या आजोबांवर टीका करतात. राजकारण्यांनी सातव्या निजामाबाबत नकारात्मक वक्तव्य करण्यापेक्षा विकास आणि आपल्या कामांनी लोकांना आकर्षित करायला हवं. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

निजाम संस्कृती बदलण्याचे वक्तव्य फसवे

हैदराबादचे नाव बदलणे आणि निजाम संस्कृती बदण्याचं वक्तव्य करणे म्हणजे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी नाटक करण्यासारखे आहे. हे राजकारणी गंगा-जमुनाची संस्कृती बदलू शकत नाहीत, जी हैदराबादच्या लोकांमध्ये गेल्या अनेक शतकपासून वसली आहे. माझ्या आजोबांनी नेहमीच सर्व धर्माचा सन्मान केला आहे आणि एकमेकांना एकत्र जोडले आहे. धर्मनिरपेक्षता निजाम संस्कृतीची ओळख होती, असं मीर नजफ अली खान म्हणाले आहेत.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कॅनडाचे PM ट्रुडो यांचं समर्थन; म्हणाले चिंताजनक...

निजामाच्या कार्यकाळात हैदराबादची स्थिती पश्चिमेच्या अनेक देशांपेक्षा चांगली होती. त्यांनी इतके डोनेशन दिलंय, जितकं कोणत्याही शासकाने दिलेलं नाही. अशा शासकाला लुटेरा म्हणणे निजामाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. 

दर पाच वर्षांनी केलं जातं बदनाम

लोकांची मत मिळवण्यासाठी जाती-धर्माचा आधार घेऊन त्यांना विभागलं जातं. अशा लोकांना धर्मनिरपेक्षतेचे महत्व कळणार नाही. दर पाचवर्षांनी एकदा राजकीय नेते अशा व्यक्तीला बदनाम करतात, ज्याने देश आणि राज्यातील जाती-धर्माला बाजूला ठेवून 37 वर्ष सेवा केली. आपल्या देशाची सत्ता अशा लोकांच्या हाती असणे निराशाजनक आहे, जे आपल्या इच्छेनुसार इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतात, असं मीर नजफ अली खान म्हणाले

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hyderabad election nijam mir usman ali khan mir jajaf ali khan